सोनसाखळी चोरी करणारे सराईत चोरटे गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी
By प्रशांत माने | Published: March 27, 2023 09:05 PM2023-03-27T21:05:15+5:302023-03-27T21:07:42+5:30
तपासात सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यांच्याकडून सात तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा एकूण ५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याण : एकिकडे सोनसाखळी चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असताना दुसरीकडे कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या गुन्ह्यातील चार सराईत चोरट्यांना सापळा लावून अटक केली. तपासात सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यांच्याकडून सात तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा एकूण ५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सलमान उर्फ राजकपुर असदल्ला इराणी (वय २३), हसन अजिज सय्यद (वय २४), सावर रजा सय्यद इराणी (वय ३५), मस्तानअली दुदानअली इराणी (वय ४६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी आंबिवली इराणी वस्तीतील राहणारे आहेत. सोनसाखळी चोरीच्या दाखल होणा-या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग समांतर तपास करीत आहे. या विभागातील पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहीती मिळाली की, ठाणे जिल्हयातील विविध शहरांमध्ये महिलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरी करणारे चोरटे तसेच नागरीकांना बतावणी करीत लुटणारे बनेली टिटवाळा परिसरात येणार आहेत. या माहीतीच्या आधारे वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बालाजी शिंदे, विश्वास माने, बापुराव जाधव, गोरखनाथ पोटे, विलास कडु, प्रविण बागुल, किशोर पाटील, रमाकांत पाटील, प्रविण जाधव, उल्हास खंडारे, अमोल बोरकर, महिला पोलिस हवालदार मेघा जाने, पोलिस नाईक श्रीधर हुंडेकरी, सचिन वानखेडे, पोलिस शिपाई गोरक्षनाथ शेकडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, उमेश जाधव, विनोद चन्ने, महिला पोलिस शिपाई मंगला गावित आदिंच्या पथकाने मिळालेल्या माहीतीप्रमाणो बनेली परिसरात सापळा लावून चौघा सराईत चोरटयांना पकडले. अटक आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांनी कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाणे अंतर्गत २, बाजारपेठ पोलिस ठाणे आणि डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १ तर ठाण्यातील कापुरबावडी आणि राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १ असे सहा गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शिरसाठ यांनी दिली.