हॉटेलमध्ये वेटरचं काम करणाराच निघाला सोनसाखळी चोर; १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:47 PM2021-03-04T22:47:18+5:302021-03-04T22:47:38+5:30
सराफाच्या हातातून सोनसाखळी हिसकावणारा चोरटा जाळ्यात, भोसरी पाेलिसांनी हस्तगत केला एक लाखाचा मुद्देमाल
पिंपरी : खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात गेलेल्या चोरट्याने सराफाच्या हातातून सोनसारखळी हिसकावून चोरून नेली होती. त्या चोरट्याला भोसरी पोलिसांनीअटक केली. त्याच्याकडून एक लाख २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
राजू विश्वेश्वर मासकेरी (वय ४२, रा. डोंबिवली वेस्ट, मुंबई), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील रावत ज्वेलर्स या दुकानात सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने आरोपी गेला होता. त्यावेळी सराफाच्या हातातून सोनसाखळी हिसकावून घेऊन तो पळून गेला. २८ फेब्रुवारी रोजी चोरीचा हा प्रकार घडला होता. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास भोसरी पोलिसांकडून सुरू होता.
दरम्यान, एका सराफा दुकानामध्ये विनापावती सोनसाखळी विक्रीसाठी एक ग्राहक आला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी मासकेरी याला ताब्यात घेतले. रावत ज्वेलर्स येथून सराफाच्या हातातून सोनसाखळी हिसकावून चोरून नेल्याचे त्याने कबूल केले. तसेच भोसरी येथे एका मोबाईल शाॅेपीमध्ये दुकानचालकाची नजर चुकवून मोबाईल चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंंद्र कदम, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, प्रशांत साबळे, पोलीस कर्मचारी अजय डगळे, बाळासाहेब विधाते, सागर जाधव, सागर भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हाॅटेलमध्ये वेटरचे काम करून चोरी
आरोपी हा मुंबईचा असून सध्या पुणे येथे राहण्यास आला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हाॅटेलमध्ये वेटरचे काम तो करत होता. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करीत होता. चोरीची सव्वा तोळ्याची सोनसाखळी, चोरीचे तीन मोबाईल, असा एकूण एक लाख २५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे.