सोन्याचे दागिने चोरणारी महिला गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:20 PM2019-07-04T20:20:32+5:302019-07-04T20:24:17+5:30
या घरकाम करणाऱ्या तरुणीला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली.
डोंबिवली - ठाकुर्ली परिसरात राहणा-या इंजिनियरच्या घरातील ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन सदरचे दागिने सोन्याच्या दुकानात विकणाऱ्या उर्मिला जितेंद्र कदम (२६, रा.त्रिमूर्ती नगर, झोपडपट्टी) या घरकाम करणाऱ्या तरुणीला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली.
ठाकुर्ली येथील मंगेशी डॅझल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गोपाल काबरा यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. काबरा पती-पत्नी दोघेही इंजिनिअर पदावर नोकरी करत असल्याने घराबाहेर असतात. काबरा यांच्या घरातील ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. परंतु, त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कुलूप तथवा कडीकोयंडा तुटलेला नव्हता. या प्रकरणाचा तपास कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, नितीन मुदगुन यांच्यासह पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, अजित राजपूत, सतीश पगारे, हरिश्चंद्र बंगारा आणि चित्रा इरपाचे यांचे पथक चोरटयाचा शोध घेत होती. याच दरम्यान, सात-आठ महिन्यांपासून काबरा यांच्या घरी काम करणाऱ्या उर्मिला हिच्यावर पथकाला संशय आला. पथकाने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, काबरा यांच्या घरातून तीन महिन्यांपूर्वी एक चावी चोरल्याचे सांगत दोन महिन्यांपूर्वी घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरलेल्या चावीने घराचे कुलूप उघडून दागिने चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर चोरलेले दागिने गोग्रासवाडी रोडवर असलेल्या पूजा ज्वेलर्समध्ये विकून ५० हजार रुपये घेतल्याचे सांगितले.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उर्मिलावर कारवाई करत तिला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.