आठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलांकडून जप्त
By सचिन भोसले | Published: October 3, 2022 08:20 PM2022-10-03T20:20:31+5:302022-10-03T20:21:01+5:30
शाहूपुरी पोलिसांची कारवाई, चोवीस तासांत छडा
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: नवरात्रौत्सवात देव दर्शनासाठी रविवारी गावी निघालेल्या दाम्पत्यांचे कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकात बसमधून उतरताना आठ लाख रूपये किंमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघा संशयित महिलांना सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सतरा तोळे दागिने हस्तगत केले. नकुशा बाबासो सकट (वय ४५, रा. मानेनगर, रूई, हातकणंगले), सुभद्रा कल्लाप्पा चौगले (वय ५७, रा. शिवाजी तालीम, हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. २४ तासांत चोरट्यांचा माग काढल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपास पथकास दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातील कौलव येथे राहणारे तानाजी सावंत वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांचे वाळवा (जि.सांगली) येथे मुळ गाव आहे. नवरात्रौत्सवात देवाला तेल घालण्यासाठी रविवारी ते पत्नी लता यांच्यासह एस.टी.बसने जात होते. दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात बसमधून उतरत असताना लता यांच्या बँगेतील ८ लाख किंमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
याबाबतची फिर्याद सावंत दाम्पत्यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. त्यानूसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, हवालदार ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, राहूल कांबळे, सविता सुतार यांनी तपासाला सुरूवात केली. सीसीटिव्ही फुटेज तपासून पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे सक्रीय केले. रात्रभर हातकणंगले परिसरात शोध घेऊन संशयित नकूशा सकट आणि सुभद्रा चौगले या दोघींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघींची झडती घेतली असता त्यांच्याकडून सोन्याचे गंठण, तबकसहित गंठण,लक्ष्मीहार, कोल्हापूरी साज, राणीहार, अंगठी असे एकूण १७ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या पथकाला पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दहा हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले