चांदीचा मुलामा देऊन सोन्याची तस्करी; दीड कोटींच्या सोन्यासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:30 PM2019-03-27T23:30:01+5:302019-03-27T23:35:01+5:30
नेब्युलायजरच्या नावाखाली दीड कोटींच्या सोन्याची तस्करी
मुंबई - नेब्यूलायजरच्या नावाने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) दोन दलालांसह तिघांना अटक केली. याप्रकरणी साडे चार किलो सोने हस्तगत केले असून त्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. अहमद मोहम्मद बेद्रा (56), महेंद्र काटे (48) आणि रविंद्र सोनार (38) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
आरोपींपैकी काटे व सोनार दोघेही सीमाशुल्क दलाल असून बेद्रा हा याप्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. सहार कार्गोमध्ये आयात करून आलेल्या 15 खोक्यांमधून सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार हा माल ताब्यात घेऊन तपासणी केली असता सहा खोक्यांमधील नेब्यूलायजरमध्ये मशीनच नसल्याचे दिसून आले. त्यात चांदीचा मुलामा देऊन सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या मालाचे दलाल सोनार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याला काटेने हे सोने दिल्याचे उघड झाले आहे. पुढे काटेच्या चौकशीत अजय ऊर्फ अहमद बेद्रा याचा हा माल असल्याचे सांगितले. त्यानुसार तिघांनाही डीआरआयने अटक केली. चौकशी बेद्राला हा माल केरळातील एका व्यक्तीने त्याच्यामार्फत मागवला असल्याचे सांगितले. या मालासाठी बेद्रा काटे व सोनार यांना 20 ते 22 हजार रुपये देत होता. तसेच बेद्राला प्रत्येक कन्सायमेंटमागे 50 हजार रुपये मिळत होते. गेल्या काही काळात बेद्राने 10 वेळा अशापद्धतीने माल आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.