डीजे लाइटमधून सोन्याची तस्करी; १२ किलो सोने जप्त; डीआरआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:26 IST2024-12-14T06:26:19+5:302024-12-14T06:26:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डीजे कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लाइटमधून सोन्याची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

Gold smuggling from DJ Light; 12 kg gold seized; DRI action | डीजे लाइटमधून सोन्याची तस्करी; १२ किलो सोने जप्त; डीआरआयची कारवाई

डीजे लाइटमधून सोन्याची तस्करी; १२ किलो सोने जप्त; डीआरआयची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डीजे कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लाइटमधून सोन्याची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. कारवाईदरम्यान १२ किलो सोने जप्त करण्यात आले असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. सोने तस्करीचा हा प्रकार पाहून अधिकारी देखील चक्रावून गेले आहे. 

मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागातून सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी काही सामानाची तपासणी केली असता डीजे लाइटच्या बॉक्सचीदेखील अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

त्या दरम्यान डीजे लाइटच्या आतमध्ये विशिष्ट कप्पे तयार करत त्यात हे सोने लपविल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या डीजे लाइटच्या गोडाऊनवर छापेमारी केली असता एकूण ६८  लाइटमध्ये अशा प्रकारे सोने तस्करीसाठी विशिष्ट कप्पे केल्याचे आढळून आले. त्यामुळे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाल्याचा अधिकाऱ्यांना संशय असून ते याचा तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ४९ किलो सोने जप्त केले होते.

Web Title: Gold smuggling from DJ Light; 12 kg gold seized; DRI action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.