बाबो! कारमधून नेत होते चक्क सोन्याची होडी; तस्करीचा फंडा पाहून पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:57 PM2021-07-19T17:57:06+5:302021-07-19T17:59:43+5:30
पोलिसांनी ५ तरुणांना ठोकल्या बेड्या; अधिक तपास सुरू
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सोने तस्करीची एक वेगळीच घटना समोर आली आहे. नाकाबंदी सुरू असताना उघडकीस आलेल्या या घटनेनं पोलीस चक्रावून गेले. काही व्यक्ती कारमधून चक्क सोन्याची होडी घेऊन प्रवास करत होते. या होडीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तस्करांना पकडण्यासाठी नाकाबंदी लावली. त्यात ५ जण अलगद सापडले. पोलिसांनी पकडलेली होडी जवळपास दीड किलोची आहे.
काही व्यक्ती कारमधून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मनोरी पासवर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एका कारमध्ये पोलिसांना सोन्याची होडी दिसली. या प्रकरणी पोलिसांनी प्रयागराज आणि कौशांबीतील ५ तरुणांना अटक केली. तिलक सिंह (कौशांबी), सूरज वर्मा (प्रयागराज), धीरेंद्र पाल (कौशांबी), विमलेश कुमार (कौशांबी) आणि रामधन (प्रयागराज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
आसाममधून आणलेलं सोनं विकायला जात असल्याची माहिती आरोपींनी पोलीस चौकशीत दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे सोने खरेदीशी संबंधित कागदपत्रं मागितली. मात्र त्यांना कोणतीही कागदपत्रं दाखवता आली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी होडी ताब्यात घेतली आणि ५ जणांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला अहवाल पाठवला आहे.