खुशखबर! हद्यरोगी मुंबई पोलिसांसाठी ‘डिफिब्रिलेटर’; १० मशीन खरेदीला हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:38 PM2019-01-08T20:38:27+5:302019-01-08T20:40:30+5:30
त्यासाठी ११ लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्याच्या खरेदीला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.
मुंबई - सतत ताणतणाव व धावपळीच्या कार्यपद्धतीमुळे हद्यविकाराला सामोरे जावे लागणाऱ्या मुंबई पोलिसांवरील उपचाराला उपयुक्त ठरणारे ‘डिफिब्रिलेटर’ हे यंत्र आता लवकरच खरेदी केले जाणार आहे. मुंबई आयुक्तालयातर्गंत अधिकारी व अंमलदार यांच्यावरील उपचारासाठी १० मशीन घेतली जाणार आहेत. त्यासाठी ११ लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्याच्या खरेदीला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.
मुंबई पोलीस दलात ५० हजारावर अधिकारी व अंमलदारांचा फौजफाटा असून पोलिसांवरील उपचारासाठी नागपाडा येथील मुख्य रुग्णालयासह १६ लहान मोठी दवाखाने कार्यरत आहेत. त्याठिकाणी आवश्यकतेप्रमाणे डिफिब्रिलेटर मशीन पुरविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुंबईत पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा असली तरी प्रत्येक घटकामध्ये किरकोळ विकारावरील उपचारासाठी स्वत:ची रुग्णालये आहेत. त्यामध्ये नायगावात दोन रुग्णालय, शहर व उपनगरात १२ दवाखाने आणि दोन फिरते (मोबाईल) दवाखाने आहेत. याठिकाणी हद्यविकार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचारसाठी आवश्यक असलेल्या डिफिब्रिलेटर मशीनची कमतरता होती. त्यामुळे ती खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्तांकडून गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली असून विहित पद्धतीने निविदा मागवून त्याची खरेदी करण्याची सूचना करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
डिफिब्रिलेटर मशीनची उपयुक्तता
एखाद्याला हद्यविकाराचा झटका आल्यास त्याला एका यंत्राद्वारे छातीवर उच्च दर्जेचा विद्युत शॉक दिला जातो. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राला डिफिब्रिलेटर म्हणतात. त्याच्या वापरामुळे रुग्णाचे बंद पडलेले हद्य पूर्ववत सुरु होण्यास मदत मिळते, वेळेत त्याचा वापर झाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.