गुडविन ज्वेलर्स फसवणूकप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 02:37 PM2019-10-30T14:37:40+5:302019-10-30T14:41:45+5:30
शेकडो ग्राहकांना फसवून करोडो रुपये घेऊन मालक पसार
नालासोपारा - वसई पश्चिमेकडील स्टेला परिसरात असलेल्या गुडविन ज्वेलर्सने ऐन दिवाळीत शेकडो ग्राहकांची फसवणूक करत करोडो रुपयांना चुना लावून पसार झाले आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे मॅनेजर आणि मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील बऱ्हामपूर येथील स्टेला पेट्रोलपंपांच्या मागे असलेल्या कर्मा अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/101 मध्ये राहणाऱ्या सुनीता महेंद्र श्रीरामदार (52) यांनी 1 सप्टेंबर 2018 रोजी गुडविन ज्वेलर्सचे मॅनेजर भालानंदन व मालक यांनी व्याजाचे व मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवून त्यांच्या स्कीममध्ये सुनीता आणि त्यांच्या मुलीला व असंख्य ग्राहकांना पैसे भरण्यास भाग पाडले. त्यांची मुलगी मधुरा आशिष संगावार हिने 1 सप्टेंबरला 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली असता ते माघारी न करता फसवणूक केलेली आहे. काही ग्राहकांकडून सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने आगाऊ रक्कम व जुने सोने घेऊन ते माघारी न करता त्यांचीही फसवणूक केले आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे त्या ग्राहकांनी ज्वेलर्सच्या दुकानासमोर मोठी गर्दी केल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ऐन दिवाळीमध्ये लोकांची फसवणूक झाल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.