नागपुरात क्षुल्लक कारणावरून गुंडांचा प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:31 AM2020-02-14T00:31:32+5:302020-02-14T00:32:09+5:30
बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात घडवून आणणाऱ्या गुंडांनी अपघातग्रस्त तरुणाला सिमेंटच्या विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच बाजूची मंडळी धावली. त्यांनी जखमीला आरोपींच्या तावडीतून वाचविले आणि आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात घडवून आणणाऱ्या गुंडांनी अपघातग्रस्त तरुणाला सिमेंटच्या विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच बाजूची मंडळी धावली. त्यांनी जखमीला आरोपींच्या तावडीतून वाचविले आणि आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी रात्री ९.१५ च्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळच्या पेट्रोल पंपानजीक ही संतापजनक घटना घडली. अंकुर दीपक धकाते (वय २२, रा. नरेंद्रनगर) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे.
राहुल अनिल गाडगे (वय २७, रा. कस्तुरीनगर, गोटाडपांजरी) आणि त्याचा मित्र स्वप्निल ठाकरे (वय ३० रा. बालाजीनगर, गजानन मंदिराजवळ) हे दोघे बुधवारी रात्री वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये लग्नासाठी गेले होते. रात्री ९.१५ ला तिकडून परत येत असताना नरेंद्रनगर चौकातील पेट्रोल पंपाजवळ अचानक आरोपी अंकुर आणि त्याच्या एक अल्पवयीन साथीदाराने वेगात पल्सर राहुलच्या दुचाकीजवळून नेली. त्यामुळे राहुल गोंधळला अन् त्याची दुचाकी स्लीप झाली. दोघेही खाली पडून जखमी झाल्याने राहुलचा मित्र स्वप्निल याने पल्सरवरील आरोपी तरुणांना व्यवस्थित दुचाकी चालव असे म्हटले. या क्षुल्लक कारणावरून आरोपी पल्सरचालक अंकुर धकाते आणि त्याचा अल्पवयीन साथीदार दुचाकी बाजूला ठेवून स्वप्निल ठाकरेच्या अंगावर धावून आले. त्यांनी त्याला हातबुक्कीने मारहाण करून रस्त्यावर पडलेली सिमेंटची विट उचलली. स्वप्निलच्या डोक्यावर, कपाळावर मारून त्याला गंभीर जखमी केले. राहुल मित्राला वाचविण्यासाठी गेला असता त्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात स्वप्निल ठाकरे गंभीर जखमी झाल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी धाव घेतली आणि आरोपींना पकडले. पोलिसांना माहिती कळविण्यात आली. बेलतरोडीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. स्वप्निलला रुग्णालयात हलविण्यात आले. एएसआय सय्यद मुस्ताक यांनी राहुलची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी आरोपी अंकुर धकातेला प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याच्या आरोपाखाली अटक केली तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.
आरोपी अट्टल गुन्हेगार
बेलतरोडी पोलिसांनी आरोपी अंकुर धकाते आणि त्याच्या साथीदाराचा क्राईम रेकॉर्ड तपासला असता, ते दोघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही तपासात उघड झाले.