नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस :३० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:35 PM2020-02-14T23:35:39+5:302020-02-14T23:39:20+5:30

गुंडांच्या दोन गटात झालेल्या वादानंतर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी ३० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली.

Goons chaos : More than 30 vehicles vandalized in Yashodharanagar, Nagpur | नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस :३० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड

नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस :३० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड

Next
ठळक मुद्देतलवारीच्या धाकावर गोंधळ : परिसरात प्रचंड दहशत, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंडांच्या दोन गटात झालेल्या वादानंतर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी ३० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. तलवार आणि दंडुके हातात घेऊन पाच ते सात गुंड बराच वेळ परिसरात दहशत पसरवत होते. नागरिकांना धमक्या देत होते. त्यामुळे या भागातील नागरिक कमालीचे भयभीत झाले होते.


सूत्रांच्या माहितीनुसार, कळमना रेल्वे क्रॉसिंगजवळ गेल्या अनेक दिवसांपासून काही गुंड जुगार अड्डा चालवितात. त्यातील जुबेर आणि बोकडे नामक गुंडांमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. त्यांच्यात एकमेकांना धमक्या देणे, पैसे हिसकावून नेणे असे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर चेतनचा मित्र गुलशन याने एका तरुणीच्या माध्यमातून गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास जुबेरला गोळीबार चौकात बोलवून घेतले. जुबेर पोहचताच गुलशन आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जबर मारहाण केली. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून जुबेर तेथून पळाला. त्याने हल्ल्याची माहिती आपल्या साथीदारांना दिली. त्यामुळे रात्री १० च्या सुमारास जुबेरचे साथीदार शेरू, फरदीन आपल्या पाच ते सात गुंडांसह तलवार, दंडुके, रॉड घेऊन यशोधरानगरातील धम्मदीपनगरात पोहचले. तेथील ई रिक्षा, कारसह १३ वाहनांची त्यांनी तोडफोेड केली. त्यानंतर वनदेवीनगरात असाच हैदोस घालून तोडफोड केली. त्यांनी पंचवटीनगर, इंदिरानगर, धम्मदीपनगर, गुरुवारी बाजार परिसरात प्रचंड आरडाओरड करीत ३० ते ३५ गाड्यांची तोडफोड केली.
गुंडांचे हे टोळके दारूच्या नशेत टुन्न होते. त्यांचा आविर्भाव पाहून परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आले. कुणी आडवे आले, रस्त्यावर आले तर जिवे ठार मारू, अशी धमकी आरोपी देत होते. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीत आले होते. हिम्मत करून काहींनी आरडाओरड केली. तर काहींनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांचा ताफा तिकडे धावला. दरम्यान, आरोपी पळून गेल्यानंतर या भागातील नागरिक एकत्र झाले. तोवर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

चौघांना अटक, इतरांची शोधाशोध
नागरिकांनी मोठ्या संख्येत यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात पोहचले. त्यांनी नागरिकांची कशीबशी समजूत काढून त्यांना परत पाठविले. आरोपींचा हैदोस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या आधारे एक अल्पवयीन आणि चार अन्य असे पाच आरोपी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. शेरू उर्फ फरदीन खान (वय २०), कामिल परवेज आलम (वय २०) अब्दुल आदिल अब्दुल शाहिद (वय २०) आणि नुमान अंसारी अब्दुल करिम अंसारी (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

२४ तासानंतरही नागरिकांचा संताप
या घटनेला २४ तास झाले तरी नागरिकांचा रोष निवळला नव्हता. आरोपींना चांगला धडा शिकवा, अशी मागणी या भागातील रहिवाश्यांनी लावून धरली होती. घोळक्या घोळक्याने जमा झालेली मंडळी या भागात घटनेबद्दल संताप व्यक्त करीत होती. त्यामुळे शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. ते लक्षात घेता ठाणेदार दीपक साखरे आपल्या सहका-यांसह परिसरात गस्त करीत होते.

तीन गुन्ह्यांची नोंद !
गुलशननगरातील बोकडेच्या जुगार अड्डयावरून जुबेरने रक्कम लुटली. त्यामुळे त्याला धडा शिकविण्यासाठी बोकडेने एका तरुणीचा वापर करून जुबेरला गोळीबार चौकात बोलविले आणि त्याच्यावर चाकूहल्ला केला. हा पहिला गुन्हा तहसील ठाण्यात तर धम्मदीप आणि वनदेवीनगरात जुबेरच्या साथीदारांनी गाड्यांची तोडफोड केल्याबद्दल दोन वेगवेगळे गुन्हे यशोधरानगरात असे एकूण तीन गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. आरोपींकडून तलवार, बेसबॉलचे दंडे जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Goons chaos : More than 30 vehicles vandalized in Yashodharanagar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.