लग्नाच्यावेळी वधूने टॉयलेटच्या बहाण्याने काढला पळ; वर म्हणाला, "सर्व काही लुटले..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:55 IST2025-01-05T10:54:23+5:302025-01-05T10:55:50+5:30
वराचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी त्याने वधूला साड्या आणि दागिने दिले होते. तसेच, लग्नाचा इतर खर्चही केला.

लग्नाच्यावेळी वधूने टॉयलेटच्या बहाण्याने काढला पळ; वर म्हणाला, "सर्व काही लुटले..."
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये (Gorakhpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्यावेळी वधूने रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. वधूसोबत तिची आईही घटनास्थळावरून बेपत्ता झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, एका व्यक्तीच्या मध्यस्थीने लग्न ठरवले होते, असे वराने सांगितले. तसेच, यासाठी मध्यस्थी व्यक्तीला ३० हजार रुपये देण्यात आल्याचेही वराने सांगितले.
रिपोर्टनुसार, हे प्रकरण गोरखपूरच्या खजनी परिसरातील आहे. याठिकाणी ४० वर्षीय शेतकरी आपल्या दुसऱ्या लग्नासाठी विधी पूर्ण करत होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. हा वर सीतापूरच्या गोविंदपूर गावचा रहिवासी आहे. लग्नासाठी ३० हजार रुपये देऊन त्याने मध्यस्थाच्या मदतीने लग्न ठरवले होते.
वराचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी त्याने वधूला साड्या आणि दागिने दिले होते. तसेच, लग्नाचा इतर खर्चही केला. यानंतर तो आपल्या कुटुंबीयांसह लग्नासाठी मंदिरात पोहोचला, जिथे नववधू तिच्या आईसोबत हजर राहिली होती. लग्नाचे विधी सुरू होताच वधूने शौचालयाला जाण्याचा बहाणा केला आणि निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. यादरम्यान तिची आईही बेपत्ता झाली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वराने सांगितले की, माझे कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी मी लग्न करण्याचे ठरवले होते, मात्र सर्व काही लुटले गेले. या प्रकरणाबाबत गोरखपूरचे एसपी (दक्षिण) जितेंद्र कुमार म्हणाले की, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल.