बिद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांचे सरकारी वकिलांना असहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 09:17 PM2019-05-29T21:17:33+5:302019-05-29T21:18:45+5:30
आयुक्तांकडे लेखी तक्रार : खटल्यातून बाहेर पडण्याचा इशारा
नवी मुंबई - सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे नाराजी व्यक्त करत खटला सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांचीच भूमिका वादात सापडली आहे.
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र घरत यांची नेमणूक होऊन महिना उलटला तरीही अद्याप खटल्यासंदर्भातील आवश्यक माहिती नवी मुंबईपोलिसांकडून मिळालेली नाही.
विशेष म्हणजे आलिबाग कोर्टात गेल्या तीन केसची सुनावणी झाली. त्या सुनावणीवेळी प्रमुख तपास अधिकारीच गैरहजर होते. त्यावरून पोलिसांकडून अप्रत्यक्ष आरोपींना मदत होत असल्याचाही संशय अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग कोर्टानेही यावर नाराजी व्यक्त केली असून नवी मुंबई पोलिसांना या खटल्यात रस का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे एकीकडे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना केसची कागदपत्र न देणे आणि दुसरीकडे अलिबाग कोर्टातही हजर न राहणे यावरून सरकारी वकील घरत यांनी नाराजी व्यक्त करीत खटल्यातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना लेखी पत्र देखील पाठवले आहे. १ जूनपर्यंत तपास अधिकाऱ्यांनी खटल्याबाबत आपल्याला कोणतेही कागदपत्र न दिल्यास आपण खटल्यातून बाहेर पडणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
सुरुवातीपासून या प्रकरणात पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आले आहेत. त्यांच्यावर नक्कीच कुणाचातरी दबाव असल्याने पोलिसांमार्फत केसमध्ये जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नाही.
- राजीव गोरे, अश्विनी बिद्रे यांचे पती