"छोटी रक्कम सरकार घेईल, मोठी रक्कम तुम्हाला देईल!", वृद्धाला लागला ५.५० लाखांचा चुना
By गौरी टेंबकर | Published: March 11, 2023 09:35 PM2023-03-11T21:35:24+5:302023-03-11T21:36:20+5:30
पीएफ ऑफिसच्या नावे वाढीव पेन्शनचा फसवा कॉल
मुंबई : छोटी रक्कम सरकार घेईल, मोठी रक्कम तुमच्या खात्यात येईल असा कॉल माजी क्लर्क असलेल्या गिरिजा अनंत नारायण (६४) नामक महिलेला पीएफ ऑफिसच्या नावे आला. त्यांना पेन्शन वाढणार असल्याचेही सांगण्यात आले, जो कॉल फसवा निघाला. मात्र दोन पैसे अधिक मिळण्याच्या नादात त्यांच्या खात्यातून ५.५० लाख काढण्यात आले. याप्रकरणी त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर अनोळखी भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर एक संध्या रावत नामक महिलेच्या नावाने फोन आला. ती पीएफ ऑफिस मधून बोलत असून तुमचे पेन्शन वाढणार आहे. मात्र तुमच्या पेन्शन खात्यात कमी रक्कम असून तुम्ही त्यात अधिक पैसे टाका म्हणजे तुमची पेन्शन वाढेल असे त्यांना सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर छोटी रक्कम सरकार घेईल व मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल, असेही नारायण यांना म्हणत त्यांचे पूर्ण नाव, पॅन कार्ड, अकाउंट नंबर देखील तिने सांगितल्याने त्यांना तिच्या विश्वास बसला. त्यानंतर जनस्मोल फायनान्स बँक नावाने अकाउंट नंबर आणि आय एफएससीकोड पाठवत त्यामध्ये ७ हजार ५१० रुपये टाकण्यास सांगितले.
अजून काही रक्कम टाकल्यानंतर हरीश त्यागी नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करत पेन्शन वाढणार आहे, असे सांगत अजून काही पैसे डीबीएस बँकेच्या खात्यात टाकण्यात सांगण्यात आली. अशाच प्रकारे नंतर आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अशा विविध बँकेचे खाते क्रमांक तसेच आयएफएससी देत त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले आणि त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी समता नगर पोलिसांना तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तांत्रिक तपास करत भामट्यांचा शोध घेत आहेत.