पाच तासांमध्ये दोन कोटींची रोकड हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 06:04 AM2020-02-15T06:04:23+5:302020-02-15T06:04:36+5:30

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई : फसवणूक करणाऱ्या दोघांना खंडवा येथून घेतले ताब्यात

Grab two crore cash in five hours | पाच तासांमध्ये दोन कोटींची रोकड हस्तगत

पाच तासांमध्ये दोन कोटींची रोकड हस्तगत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अंधेरीतील व्यापाºयाला सुमारे सहा कोटींची कर्जाऊ रक्कम देण्याच्या नावाखाली सुरक्षा अनामत म्हणून दोन कोटींची रक्कम घेऊन मध्य प्रदेशात पसार झालेल्या विनोदकुमार झा (४८) आणि अमितकुमार यादव (२६, रा. दोघेही दरबंगा, बिहार) या दोघांनाही खंडवा येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शुक्रवारी अटक केली आहे.


मुंबईतील मालाड येथील रहिवासी अक्षय परवडी यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात १२ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. विनोदकुमार झा याने सहा कोटींचे कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून बँकेत सुरक्षा अनामत ठेवण्यासाठी दोन कोटींची रक्कम घेतली. ती बँकेत भरणा करण्याचा बहाणा करून आरटीजीएसची पावती आणून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दोन कोटींची रक्कम घेऊन ती अमितकुमारकडे दिली. त्यानंतर, ठाणे रेल्वेस्थानकातून दोघेही पसार झाले. याप्रकरणी परवडी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. हे दोघेही ठाणे रेल्वेस्थानकातून पवन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून बिहारच्या दिशेने प्रवास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने काढली. फसवणुकीची माहिती १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मिळाल्यानंतर तातडीने सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेली माहिती खंडवा रेल्वे पोलिसांना ठाणे पोलिसांनी दिली. त्यानुसार, ही पवन एक्स्प्रेस खंडवा रेल्वेस्थानकात रात्री १० वाजता येताच म्हणजे अवघ्या पाच तासांमध्येच या दोघांनाही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन कोटींच्या रोकडसहित पकडले. या दोघांनाही १३ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक यांच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांना अटक केली. त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.


करोडपती होण्याचे होते मनसुबे
विनोदकुमार झा आणि त्याचा साथीदार अमित हे दोघेही पाच तासांसाठी करोडपती झाले होते. तोपर्यंत या पैशांमध्ये कायकाय करायचे, याचे त्यांनी अनेक मनसुबे आखले होते. परंतु, खंडवा रेल्वेस्थानकात रेल्वे थांबल्यानंतर त्यांचे सर्व मनसुबे धुळीला मिळाले.


गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी जेरबंद
या फसवणुकीची तक्रार १२ फेब्रुवारी रोजी ठाणे गुन्हे शाखेकडे आली. याची तत्काळ दखल घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सूत्रे हलविली. विशेष म्हणजे या फसवणुकीची तक्रार आरोपींच्या अटकेनंतर १३ फेब्रुवारी रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली.

Web Title: Grab two crore cash in five hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस