फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:46 PM2018-12-15T14:46:51+5:302018-12-15T14:57:53+5:30
तुमच्या मालकाने पैसे देण्यास सांगितल्याचे खोटे सांगून बनावट चेक देऊन २ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़.
पुणे : तुमच्या मालकाने पैसे देण्यास सांगितल्याचे खोटे सांगून बनावट चेक देऊन २ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़. अब्बास सैफुद्दीन उकानी ऊर्फ दत्तात्रय सोनु शिंदे (वय ४४) आणि मुकेश परमेश्वर मेमन (वय ५४, दोघे रा़. वसई ईस्ट,जि. पालघर) अशी त्यांची नावे आहेत़. त्यांच्याकडून शिक्रापूर, शिरुर तसेच औरंगाबाद, नाशिक, सांगली येथील ८ गुन्हे उघडकीस आले आहेत़. त्यांनी यापूर्वी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, प़ बंगाल, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यात २० हून अधिक गुन्हे केले असून त्यासाठी विमानाने फिरत असल्याची माहिती समोर आली आहे़.
शिक्रापूर गावातील बँकेतून २ लाख रुपये एकाने काढले असताना त्याच्याजवळ एक जण आला व त्याने बँक आॅफ महाराष्ट्राचा चेक त्यांना दिला व तुमच्या मालकाने मला पैसे देण्यासाठी सांगितले आहे, असे सांगून फसवणूक त्यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन गेला होता़. २७ सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती़. अशाप्रकारे शिरुर पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर २०१८ ला गुन्हा दाखल झाला होता़. स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करीत असताना त्यांना अशाप्रकारचे गुन्हे औरंगाबाद, नाशिक, सांगली, पुणे शहरात घडल्याचे आढळून आले होते़. त्या ठिकाणचे सी़ सी़ टी़ व्ही़ फुटेजची माहिती संकलित करुन त्याचा तपास करताना अब्बास उकानी व मुकेश मेमन यांनी अशा प्रकारे गुन्हे गुजरात मध्ये केले असून ते रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळाली़. दमण येथील पोलिसांनी त्यांना अटक केली होती़. सीसीटीव्ही फुटेमध्ये आढळलेले आरोपी आणि प्रत्यक्ष अटक केलेल्या आरोपी एकच असल्याचे दिसून आले़.फिर्यादींनी यांनीच चेक दिल्याचे सांगितले़ ते चेक त्यांनी चोरलेले होते़. त्याचा तपास करीत असताना दोघे जण शिक्रापूर परिसरात जीपने येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या गाडीत ८० हजार रुपये मिळाले़. जीपसह ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़. शिक्रापूर, शिरुर तसेच औरंगाबादमधील सिडको एमआयडीसी, क्रांती चौक, वेदांतनगर पोलीस ठाणे तसेच नाशिकमधील आडगाव, भद्रकाली पोलीस ठाणे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अशाप्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत़. अधिक तपासासाठी त्यांना शिक्रापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे़.