एटीएसच्या कारवाईविरोधात आणि आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 07:49 PM2018-08-17T19:49:37+5:302018-08-17T19:51:34+5:30
वैभव निर्दोष असल्याचा मोर्च्यात दावा
नालासोपारा - स्फोटकं सापडल्या प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी नालासोपाऱ्यात निषेध मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्च्यात सामील झाले होते. वैभवला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
नालासोपारा येथे राहणारा हिंदुत्वादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरात राज्य दहशतवाद विरोधी पथकाला मोठ्या प्रमाणात बॉम्ब, बॉम्ब बनविण्याचे सामान आणि शस्त्रास्त्रे सापडली होती. त्याला अटक केल्यानंतर नालासोपाऱ्यातील हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आणि वैभव राऊतला विनाकारण या प्रकरणात गोवले गेल्याचा आरोप करण्यात आला. वैभव राऊत हा भंडारी समाजाचा असल्याने भंडारी समाजाने आज मोर्च्याची हाक दिली होती. आज संध्याकाळी साडेचार वाजता वैभव राऊत रहात असलेल्या भंडार आळीतून हा मोर्चा निघाला. या मोर्च्यात वसई विरारसहपालघर जिल्ह्यातील भंडारी समाजातले नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. त्यात महिला आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती. नालासोपारा बस आगारावरील रस्त्यावर मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. वैभव राऊतच्या पत्नीने हा कट असल्याचा आरोप केला. यावेळी 'देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो', 'जय श्रीराम' च्या घोषणा देण्यात आल्या. मै भी वैभव राऊत असे फलक लावण्यात आले होते. वैभव राऊत याला फसविण्यात आले असून शेवटपर्यंत त्याला साथ देणार असल्याची घोषणा यावेळी कऱण्यात आली. या मोर्च्यात ५ हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते. मोर्चा संध्याकाळी पाच वाजता निघणार होता. मात्र नंतर पोलिसांनी लवकर मोर्चा काढण्यास सांगितले होते. शिवसेना, आगरी सेनेने मोर्च्याला पाठिंबा दिला. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अभूतपुर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोपार गावापासून रेल्वे स्थानक परिसरात जागोजागी पोलीस तैनात कऱण्यात आले होते.