नातीची काढली छेड; जाब विचारायला गेलेल्या आजोबांना मरेपर्यंत केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 09:50 PM2021-12-24T21:50:52+5:302021-12-24T21:51:55+5:30
Murder Case : नंतर छेड काढल्याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी त्यांना मारहाण करत शिविगाळ करायला सुरुवात केली.
पाटणा - आपल्या नातीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या आजोबांची गावगुंडांकडून हत्या केली आहे. गावातील आपल्या दुकानात बसलेल्या नातीची एका गुंडाने छेड काढली. ही बाब मुलीने तिच्या वडिलांना आणि आजोबांना सांगितली. नंतर वडील आणि आजोबा याचा जाब विचारत असताना तरुणांनी त्यांना जबर मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत आजोबांचा मृत्यू झाला.
बिहारच्या आरा भागात ६५ वर्षांचे भरत साह कुटुंबीयांसोबत राहत असत. आपल्या गावात दुकान चालवून ते उदरनिर्वाह करीत असत. दुकानात काही वेळा त्यांची १२ वर्षांची नात बसून दुकानाचा व्यवहार सांभाळत असे. हत्येच्या घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे त्यांची नात दुकानात बसली होती. त्यावेळी गावातील एक गुंड तिथे आला आणि तिची छेड काढली. याबाबत मुलीने तिचे वडील आणि आजोबांना हकीकत सांगितली.
क्राइम :नग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याची पोलिसांना संशय
नंतर छेड काढल्याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी त्यांना मारहाण करत शिविगाळ करायला सुरुवात केली. दोघांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यावेळी बेदम मारहाणीत भरत साह बेशुद्ध पडले. त्यांना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.