हा तर आत्महत्येचा स्टंट; पाणी अंगावर ओतून घेऊन ती करत होती आत्मदहन!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:52 PM2018-08-01T16:52:59+5:302018-08-01T16:55:12+5:30
बीड जिल्ह्यातील पाली येथे राहणाऱ्या राधाबाई साळुंखे (वय - ७०) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दिले सोडून
मुंबई - मंत्रालयासमोर आजवर रॉकेल ओतून, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण आज एका आजीने चक्क पाणी अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी घडली. राधाबाई साळुंखे (वय - ७०) असे या वृद्ध महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. आता त्या त्यांच्या गावाकडे जाण्यास निघाल्या असल्याची माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली.
बीड तालुक्यातील पाली येथे राहणाऱ्या राधाबाई साळुंखे यांनी आज सकाळी मंत्रालयसमोर स्वतःवर पाणी ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत ड्रामा केला आणि संबंध सुरक्षा यंत्रणा हादरून सोडल्या. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी पाण्याची बॉटल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती गंगावणे यांनी दिली. साळुंखे यांना मंत्रालयातील सुरक्षा विभागने तातडीने ताब्यात घेतले आणि मारिन ड्राईव्ह पोलिसांच्या आजींना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आजींची सुटका केली. बीड तालुक्यातील पाली येथील रहिवासी राधाबाई कुंडलिक साळुंके यांचा गावातीलच नवनाथ साहेबा साळुंके यांच्याशी जमिनीसंदर्भात वाद सुरु होता. राधाबाई साळुंके यांनी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख बीड यांच्याकडे या जमिनीसंदर्भात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जागेमध्ये पाणीपुरवठा विभागाने रस्ता व कार्यालय बांधले असून या कामी कोणतेही भूसंपादन झालेले नाही. तसेच भूसंपादन मावेजाही मिळालेला नाही. मात्र, प्रत्यक्षात साहेबा गेना साळुंके यांची ३४ गुंठे जागा संपादित झालेली असून, त्यांनी मावेजा घेतला आहे. जागा परत नावावर करण्याची विनंती राधाबाई साळुंके यांनी या अर्जात केली होती. याप्रकरणी भूमि अभिलेख कार्यालयाने तिच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच १० गुंठे जमीन देण्याचे आदेश दिले होते. भूमि अभिलेखच्या या आदेशाविरुद्ध नवनाथ साळुंके यांनी महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अपील केले होते. हे अपील राज्यमंत्र्यांनी मान्य केले. सुनावणी होऊन २५ जुलै २०१८ रोजी राधाबाई या आजींच्या विरोधात निकाल देण्यात आला होता. राज्यमंत्र्यांनी जमिनीसंदर्भात आपल्याविरुद्ध निकाल दिला म्हणून राधाबाई साळुंके यांनी मुंबईत आत्मदहन करण्याचा ड्रामा केला.