अपंगत्वाचं ढोंग करून लुटले आजीला; घामाच्या दुर्गंधीमुळे पकडले आरोपीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 04:03 PM2019-11-08T16:03:34+5:302019-11-08T16:05:41+5:30
वृद्ध महिलेसमोरून लंगडत गेलेल्या चोराने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला
मुंबई - जोगेश्वरी येथील मेघवाडी परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. वृद्ध महिलेसमोरून लंगडत गेलेल्या चोराने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. मात्र, वृद्ध महिलेने दिलेल्या माहितीवरून मेघवाडी पोलिसांनी आरोपीला काही तासात जेरबंद केलं. मेहमूद शेख (३०) असं या अटक आरोपीचं नाव आहे.
जोगेश्वरी येथील मेघवाडी परिसरात राहणारी ७५ वर्षीय महिला २ नोव्हेंबरला सायंकाळी रस्त्याने एकटी घरी निघाली होती. एकटी प्रवास करणारी महिला आणि त्यात तिच्या गळ्यातील ऐवज पाहून मेहमूदचे डोळे पांढरे झाले. वृद्धेचे दागिने चोरण्यासाठी तसेच तिला संशय येऊ नये म्हणून त्याने अपंग असल्याचं भासवलं. लंगडत तो महिलेच्या जवळून पुढे गेला. महिलेचं लक्ष नसताना मेहमूदने पाठीमागून येऊन तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी महिलेने मेघवाडी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांनी संशयित आरोपीबाबत विचारले असता महिलेने त्याचा चेहरा अस्पष्ट दिसला. मात्र, त्याच्या अंगाला घामाचा खूपच दुर्गंध येत होता असं सांगितलं.
पोलिसांनी परिसरातील सर्व भुरट्या चोरांना पकडण्यास सुरूवात केली. त्यावेळी नुकताच तुरुंगातून सुटलेल्या मेहमूदजवळ पोलीस गेले असता त्याच्या संशयित हालचालीवर पोलिसांना संशय येत आला. त्याच्या अंगाला दुर्गंधीचा वास येत असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेसमोर मेहमूदला हजर करताच महिलेने त्याची ओळख पटवली. तुरुंगामधून सुटल्यानंतर खिशात एक रुपयाही नव्हता. भूकही लागली होती. त्यामुळे चोरी केल्याची कबुली मेहमूदने दिली. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.