500 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसाठी नातवानेच केला आजीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:58 PM2022-02-17T15:58:19+5:302022-02-17T16:54:03+5:30
Crime News : वृद्ध महिलेच्या नातू राजेश बागरीने तिच्या दोन्ही पायातील चांदीचे दागिने एका परिचित ड्रायव्हरकडे गहाण ठेवल्या होत्या आणि त्या बदल्यात त्याच्याकडून 6,000 रुपये घेतले होते.
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एका 75 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तिच्या नातवासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 500 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दागिन्यांसाठी या वृद्ध महिलेचा खून केला आणि तिचे दोन्ही पाय कापून दागिने काढून घेतले.
एसपी (ग्रामीण) भागवत सिंह विरडे यांनी सांगितले की, इंदूरपासून 35 किमी अंतरावर असलेल्या छोटी खुडैल गावात, 24 वर्षीय राजेश बागरीने एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नात आर्थिक मदत करण्यासाठी आपली आजी जमुना यांच्याकडे चांदीचे दागिने मागितले होते. आजीने हे चांदीचे दागिने आपल्या दोन्ही पायात घातले होते. हे दागिने राजेश बागरी याला देण्यास आजीने स्पष्टपणे नकार दिला, तेव्हा राजेश बागरीने आपल्या 19 वर्षांचा मित्र विजय ढोली याच्यासोबत आजीच्या हत्येचा कट रचला.
11 फेब्रुवारीला कट रचून आजीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळण्यात आले. जेवल्यानंतर आजी बेशुद्ध पडताच आरोपींनी तिचा गळा आवळून खून केला आणि कुऱ्हाडीने तिचे दोन्ही पाय कापून चांदीचे दागिने काढून घेतल्याचे भागवत सिंह विरडे यांनी सांगितले. तसेच, आरोपींनी महिलेचा मृतदेह तिच्या घराजवळील गोबर गॅस प्लांटमध्ये लपवून ठेवला होता, असे भागवत सिंह विरडे म्हणाले.
दोन्ही आरोपींना अटक
एसपी भागवत सिंह विरडे यांनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या नातू राजेश बागरीने तिच्या दोन्ही पायातील चांदीचे दागिने एका परिचित ड्रायव्हरकडे गहाण ठेवले होते आणि त्या बदल्यात त्याच्याकडून 6,000 रुपये घेतले होते. राजेश बागरी आणि त्याचा मित्र विजय ढोली यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.