सामान्य महिलांच्या नावे लाटले वारांगनांचे अनुदान; नागपुरातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 06:29 AM2021-07-20T06:29:33+5:302021-07-20T06:30:21+5:30
कोरोनाकाळात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये म्हणून सरकारने सानुग्रह अनुदान दिले होते.
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाकाळात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये म्हणून सरकारने सानुग्रह अनुदान दिले होते. या व्यवसायात नसलेल्या परिचित सामान्य महिलांची नावे यादीत टाकून दलालांनी वारांगनांसाठीचे अनुदान लाटले. हा गंभीर प्रकार सामान्य महिलांच्या लक्षात आल्याने प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.
हा प्रकार सामान्य महिलांसाठी बदनामीकारक असल्याने भीतीपोटी कुणीही याची तक्रार विभागाकडे अथवा पोलिसात केली नाही. लॉकडाऊनचा परिणाम वारांगणांवरही झाला. न्यायालयाने शासनाला त्यांची मदत करण्याचे आदेश दिले. महिला व बाल कल्याण विभागाने या महिलांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी १५ हजार व १८ वर्षाखालील मूल असल्यास अधिक ७५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. विभागाने जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून अर्ज मागविले. पथकाने या क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थाना हे काम दिले होते.
असे फुटले बिंग
दलालांनी या व्यवसायात नसलेल्या परिचितांना खोटी माहिती देऊन त्यांच्याकडून कागदपत्रे गोळा केली. अनुदान मिळाल्यानंतर ५० टक्के रक्कम देण्याचे ठरले. मात्र, संबंधित महिलेच्या खात्यात अनुदान जमा झाल्यानंतर दलालाने ७५ टक्के रक्कम मागितली. महिलेने नकार दिला. अनुदानासंदर्भात माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना धक्काच बसला.