बाेहल्यावर चढण्याआधीच नवरदेव झाला चतुर्भुज, चाेरी प्रकरणात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 12:28 AM2020-12-07T00:28:38+5:302020-12-07T00:29:42+5:30
Crime News : नवरदेव आपल्या टाेळीसह चाेरीच्या गुन्ह्यांत सामील असून त्याच्याकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
नालासोपारा : लग्नात बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाला चाेरीच्या प्रकरणात वसईच्या क्राइम ब्रांचने अटक केली आहे. नवरदेव आपल्या टाेळीसह चाेरीच्या गुन्ह्यांत सामील असून त्याच्याकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. विष्णू सेठ असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडे राहणारा जय पुजारी आणि विष्णू सेठ दोघेही मित्र आहेत. पुजारी हा सराईत चोर आहे. तो आपल्या मित्रांसोबत मिळून नालासोपारा परिसरातील बंद घरांवर पाळत ठेवून चोरीच्या घटना करत होते. चोरी केलेले सोन्याचे दागिने विष्णू सेठला विकायचा.
चोरीच्या दागिन्यांच्या पैशाने आरोपी ७ डिसेंबरला लग्नाच्या बोहल्यावर चढणार होता. त्याच्याआधीच वसईच्या क्राईम ब्राँचने नवरदेव सेठला अटक केली आहे. या गॅंगने नालासोपारा शहरात १२ पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहे. वसईच्या क्राइम ब्रांच युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना महितीदाराने माहिती दिली की, नालासोपारा शहरात चोरीच्या घटना करणारा सराईत चोर वसईच्या भोयदापाडा येथे लपून बसलेला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा मारून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
१३ गुन्हे उघडकीस
नालासोपारा आणि तुळिंज पोलीस ठाण्यांतर्गत १३ चोरीचे गुन्हे उघड केले असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. या गॅंगच्या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. नवरदेवाला पोलिसांनी २७ नोव्हेंबरला अटक करण्यात आली हाेती. पाेलीस याप्रकरणी अधिक चाैकशी करत आहेत. या घटनेची शहरात चर्चा रंगली हाेती.