शुभमंगल सावधान म्हणण्यापूर्वीच वधूला सोडून वर पसार, समोर आलं धक्कादायक कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 07:44 PM2021-07-05T19:44:24+5:302021-07-05T19:49:44+5:30
Marriage News: विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली.
जयपूर - राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील तारपुरा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विवाहाचे विधी सुरू होते. मात्र विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली. मात्र तिला कसलीच खबर लागून न देता नवरदेव पळून गेला. दरम्यान, ऐन लग्नसोहळ्यातून वर पसार होण्यामागे हुंड्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या लोभी नवरदेवाला धडा शिकवण्यासाठी वधूने आज थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच वरावर कठोर कारवाईची मागणी केली. (Groom ran away with the procession leaving the bride amidst the wedding Hall )
मिळालेल्या माहितीनुसार तारपुरा गावातील सूरजा राम जांगिड यांची मुलगी सुभिता हिचा विवाह बुगाला गावातील रहिवासी असलेल्या अजय याच्यासोबत निश्चित झाला होता. ३ जुलै रोजी संध्याकाळी अजय याची वरात सुभिताच्या घरी आली. वऱ्हाडी मंडळींनी चहा नाश्ता घेतला. त्यानंतर वरमाला घालण्याचा कार्यक्रम झाला मात्र या कार्यक्रमादरम्यानच वर पक्षाने हुंड्याची मागणी सुरू केली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी मंडपातून काढता पाय घेतला. काही वेळाने वर आणि त्याचे सहकारीही वधूला सोडून निघून गेले.
सप्तपदीच्या वेळी जेव्हा वधूच्या कुटुंबाला याची माहिती मिळाली. त्यानंतर मागचे दोन दिवस दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र त्यातून कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेरीस वधूचे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांजवळ पोहोचले. वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याबाबत आपल्याला मारहाण केली आणि शिविगाळही केली. आपण वराच्या कुटुंबीयांना खूप विनवणी केली. मात्र ते वरात घेऊन परत गेले.
दरम्यान, वधूने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षभरापासून अजय हा तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. मात्र आता तो तिला सोडून गेला आहे. या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी वधूपक्ष पोलिसांवरही आरोप करत होता. अखेरीस त्यांना पोलीस अधिक्षकांकडे धाव घ्यावी लागली.