नवरीच्या डोक्यावर केस होते कमी, बघताच नवरदेवाने लग्नास दिला नकार आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:22 AM2023-02-24T11:22:42+5:302023-02-24T11:23:23+5:30
अयोध्याच्या जमोली गावातील ही घटना आहे. वरात नवरीच्या दारात पोहोचल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार झाला. त्यानंतर नवरदेवासहीत वराती जेवण करत होते.
लग्नाबाबत नवरी-नवरदेवाच्या मनात अनेक स्वप्न असतात. नव्या सुरूवातीसाठी त्यांनी अनेक स्वप्नं पाहिलेली असतात. पण अयोध्यामध्ये एक संसार सुरू होण्याआधीच संपला. इथे वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाने अचानक लग्न करण्यास नकार दिला. ज्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. मुलीकडच्या लोकांनी नवरदेवाला आणि त्याच्या नातेवाईकांना पकडलं. नंतर वाद सुरू झाला. याची पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलांसहीत 9 लोकांवर गुन्हा दाखल केला.
अयोध्याच्या जमोली गावातील ही घटना आहे. वरात नवरीच्या दारात पोहोचल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार झाला. त्यानंतर नवरदेवासहीत वराती जेवण करत होते. तेव्हाच कुणीतरी नवरदेवाला जाऊन सांगितलं की, ज्या मुलीसोबत तो लग्न करत आहे तिच्या डोक्यावर केस फार कमी आहेत. हे ऐकून नवरदेव नाराज झाला आणि परिवाराला घेऊन मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीच्या डोक्यावर केस पाहिले. त्यालाही केस कमी दिसले आणि इथे सगळा वाद पेटला.
नवरदेवाने लग्नास नकार देताच तिथे गोंधळ झाला. पाहुणे लग्न सोडून जाऊ लागले, यादरम्यान गपचूप पळून जात असलेल्या नवरदेवाला आणि त्याच्या परिवाराला मुलीकडील लोकांनी पकडलं. दोन्ही परिवारांमध्ये बाचाबाची सुरू झाली.
मुलाने मुलीकडील लोकांवर आरोप केला की, मुलीकडील लोकांनी आमची फसवणूक केली. मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत हे लपवून लग्न लावून दिलं जात होतं. तर नवरीच्या बहिणीने आरोप केला की, लग्नाआधीच लग्न जुळवणाऱ्या व्यक्ती, त्याची पत्नी, नवरदेवाचा काका आणि नातेवाईकांना याबाबत सांगण्यात आलं होतं.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्हीकडील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलिसांसमोरच दोन्ही परिवारातील लोक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते.
दुसरीकडे नवरीकडील लोकांनी नवरदेवाच्या परिवारावर हुंड्याचे पैसे मागून लग्न तोडण्याचा आरोप केला. पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा हा वाद मिटला नाही तेव्हा मुलीकडील लोकांच्या लिखित तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या परिवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.