गुजरातमधील फरार गुन्हेगाराला १५ वर्षानंतर अटक; मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 09:08 PM2019-01-30T21:08:36+5:302019-01-30T21:10:05+5:30
विक्रम पटेल उर्फ विकी या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष 8 च्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तो तब्बल 15 वर्षांपासून फरार होता.
मुंबई - गुजरातमधील सुरत शहरात 2004 मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील विक्रम पटेल उर्फ विकी या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष 8 च्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तो तब्बल 15 वर्षांपासून फरार होता.
गुजरातमधील सुरत शहरात एका गुन्हेगारी टोळीने 2004 मध्ये दहशत पसरवली होती. या टोळीने गॅस कंपनीकडून आल्याचे सांगत एका व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकला होता. त्यांनी चाकूच्या धाकावर घरातील सदस्यांना डांबून घर लुटले होते. या टोळीने गुंजन शोभना या व्यावसायिकाची हत्या केली होती. या प्रकरणात उमरा पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. मात्र, विक्रम पटेल उर्फ विकी हत्येच्या दिवसापासून फरार होता. या हत्याकांडात एक़ आरोपीला फाशी आणि इतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील विकी हा हत्येच्या दिवसापासून फरार होता. या प्रकरणी महेश भोसले या आरोपीसा पॅरोलवर सोडण्यात आल्यानंतर तो दहा वर्षापासून फरार होता. पोलीस महेशच्या मागावर असताना पुण्याच्या चिंतामणी परिसरात या हत्याकांडातील फरार आरोपी विक्रम उर्फ विकी हा लपला असल्याची माहिती गुन्हे शाखा 8 च्या पोलिसांना मिळाली.
विकीला गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने या पूर्वी एका गुन्ह्यात अटक केली होती. मात्र, त्यावेळी तो हत्येतील फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांना नव्हती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो पुण्यात स्थायिक झाला. पुण्यात विकी हा मोबाइल कंपनीची गॅलरी चालवत होता. त्याची पहिली पत्नी ही मुंबईची राहणारी असून तो दुसरे लग्न करून पुण्यात वास्तव्यास होता. विकीवर 3 सराईत गुन्ह्यांची नोंद असून पोलिस त्याच्या मागावर होते. गुजरात हत्येप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस महेशच्या मागावर असताना पोलिसांना विकी पुण्यात लपला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवकर यांचे पथक 26 जानेवारी रोजी विकीला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ओळख लपवून वावरत असलेल्या विक्रांत उर्फ विकीला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.