निवडणुकीच्या मोसमात गुजरात एटीएसची मोठी कारवाई; बडोद्यात कारखान्यावर छापा, 500 कोटींचे ड्रग्ज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:21 PM2022-11-30T14:21:17+5:302022-11-30T14:22:08+5:30
Crime News : गुजरात एटीएसची ही कारवाई अशावेळी झाली आहे की, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीदरम्यान पोलिसांकडून मोठी कारवाई होताना दिसत आहे. गुजरात एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे.
बडोदा शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका उत्पादन युनिटवर छापा टाकून जवळपास 500 कोटी रुपयांचे बंदी असलेले एमडी ड्रग्स जप्त केले आहे. यासंदर्भात एटीएसच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी माहिती दिली. एटीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने मंगळवारी रात्री बडोदाजवळील एका छोट्या कारखान्यावर आणि गोदामावर छापा टाकून पाच जणांना अटक केली.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी कायदेशीर रसायनांच्या निर्मितीच्या नावाखाली एमडी ड्रग्ज तयार करत होते, जे अंमली पदार्थांच्या श्रेणीत येतात. तसेच, संपूर्ण टोळीचा भंडाफोड करण्याची मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, त्यांनी अधिक माहिती दिली नाही. अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की, एटीएसने या वर्षी ऑगस्टमध्ये बडोदा शहराजवळील एका कारखान्यातून 200 किलो मेफेड्रोन जप्त केले होते, ज्याची किंमत अंदाजे 1,000 कोटी रुपये आहे.
दरम्यान, गुजरात एटीएसची ही कारवाई अशावेळी झाली आहे की, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका आहेत. तसेच, गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरला लागणार आहेत. गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे, मात्र यावेळी आम आदमी पक्षाच्या जोरदार एंट्रीमुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.