केटामाईन तस्करी प्रकरणात गुजरातच्या केमिस्टला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 08:00 PM2022-04-20T20:00:30+5:302022-04-20T20:00:43+5:30
औषध उत्पादक कंपनीचा कर्मचारी : कंपनीतून बाहेर काढले होते केटामाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केटामाईन ड्रग्ज तस्करी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने गुजरातमधून एका औषधी कंपनीच्या केमिस्टला अटक केली आहे. मयूर पटेल असे आरोपीचे नाव असून, विज्ञान शाखेची पदवी घेतलेला हा आरोपी वापी येथील एका औषध उत्पादक कंपनीत कामाला असून, याच कंपनीतून त्याने केटामाईन बाहेर काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मालमत्ता गुन्हे कक्षाने ठाण्यातील कापूरबावडी परिसरातून प्रतीक पटेल आणि अक्रम शेख या दोघांना अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेले एक किलो केटामाईन जप्त केले होते. या ड्रग्जची किंमत ५० लाखापेक्षा अधिक असून, दोघेही कारने ठाण्यात आले होते. त्यांनी हे केटामाईन गुजरातमधून आणल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, मालमत्ता गुन्हे कक्षाचे पथक गुजरातला रवाना झाले. चौकशीदरम्यान वापी येथील एका कंपनीमध्ये प्रॉडक्शन ट्रेनी केमिस्ट म्हणून काम करणारा मयूर पटेल या २४ वर्षीय युवकाला कंपनीमधून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयूर ६ जून २०२१ पासून संबंधित कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानेच तो काम करीत असलेल्या कंपनीमधून केटामाईन बाहेर काढून पोलिसांनी ठाण्यात अटक केलेल्या आरोपींना दिल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली. मयूर हा पूर्वी दुसऱ्या कंपनीमध्ये काम करीत होता.
तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत
भारतातील काही ठराविकच कंपन्या केटामाईन तयार करीत असून, त्यातील एक कंपनी मयूर काम करीत असलेली आहे, असेही पोलिसांनी सांगितले. केटामाईन औषधामध्ये वापरले जाते. या कारवाईमध्ये जप्त केलेली कार प्रतीक याची आहे. प्रतीक आणि अक्रम या दोघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने वाढ केली असून, हे दोघे आणि मयूर या तिघांनाही आता न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे