चिमुकलीच्या रडण्याने सावत्र बाप चिडला; आधी भिंतीवर डोकं आपटलं आणि नंतर गळा दाबून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 04:25 PM2023-01-10T16:25:12+5:302023-01-10T16:26:31+5:30
अडीच वर्षीय चिमुकलीचा निर्घृण खून केल्यानंतर मृतदेह झुडपात टाकून मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव केला.
राजकोट- गुजरात राज्यातील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अडीच वर्षी मुलीच्या रडण्याचा राग आल्यानं सावत्र बापानं तिची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेह कडेवर घेऊन चालत गेला आणि झुडपात फेकून दिला. मुलीला घेऊन जात असताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.
सविस्तर माहिती अशी की, अडीच वर्षांची सावत्र मुलगी अनन्या खूप रडत होती, यामुळं रागात आलेल्या बापानं तिचं डोकं भिंतीवर आपटलं, नंतर तिचा गळा आवळून खून केला. यानंतर मुलीचा मृतदेह झुडफात फेकून घरी परतला आणि पत्नीसमोर मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव केला. शुक्रवारी रात्री त्यांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली. दुसऱ्या दिवशी गोंडल चौकासमोरील झुडपात मुलाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं.
सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा
मुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, यात शुक्रवारी आरोपी बाप मुलीचा मृतदेह घेऊन जाताना दिसला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, पण सोमवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अमित गोर असं आरोपीचं नाव असून, त्यानं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. मुलीची हत्या केली, तेव्हा आई कारखान्यात कामाला गेली होती.