Gujarat Crime News: 5 दिवसांपूर्वी आढळला डोकं नसलेला मृतदेह, आता सापडले पाय; बापच निघाला मुलाचा खुनी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 03:02 PM2022-07-24T15:02:31+5:302022-07-24T15:04:10+5:30
Gujarat: अहमदाबादमध्ये 5 दिवसांपूर्वी हात-पाय आणि डोकं नसलेला एका मृतदेह आढळला होता.
Gujarat Crime News: पाच दिवसांपूर्वी अहमदाबादच्या वसना परिसरात हात-पाय आणि डोकं नसलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या घटनेच्या 5 दिवसांनंतर आता वसनापासून 3 किमी अंतरावर असलेल्या एलिसब्रिज परिसरात मृतदेहाचे पाय सापडले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाची उकल केली असून, हा मृतदेह हितेश नावाच्या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले.
बापानेच केली मुलाची हत्या
सविस्तर माहिती अशी की, पाच दिवसांपूर्वी अहमदाबादच्या वसना परिसरात पोलिसांना एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता, त्या मृतदेहाचे डोके, हात-पाय नव्हते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि तपास सुरू असतानाच, वसनापासून तीन किमी अंतरावर असलेल्या एलिसब्रिज परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्या व्यक्तीचे छिन्नविछिन्न अवस्थेतील पाय पॉलिथिनमध्ये सापडले.
घरात आढळला चाकू आणि रक्ताचे डाग
यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये स्कूटरवरून जाणारा एक वृद्ध पॉलिथिन फेकताना दिसला. तपासादरम्यान पोलीस आरोपी बापाच्या घरी गेले, तिथे त्यांना गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि रक्ताचे डाग आढळले. यानंतर पोलिसांनी पोलिसांनी आरोपी बापाला अटक करुन चौकशी केली.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
चौकशीत आढळून आले आरोपी एम. जानी हे वर्ग-2 चे सेवानिवृत्त अधिकारी असून, ते आपल्या मुलासोबत राहायचे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह हितेशचाच असल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वृद्धाची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पण, अद्याप या हत्येमागचे नेमके कारण पोलिसांना समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.