दुसऱ्या लग्नाच्या आरोपात अडकला गुजरातचा आयएएस अधिकारी; निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 07:42 PM2019-08-15T19:42:43+5:302019-08-15T19:48:21+5:30
सरकारने निलंबन केल्यानंतर काही तासांनी दहिया यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
अहमदाबाद : गुजरात सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी गौरव दहिया यांचे निलंबन करण्यात आले आहे. दिल्लीच्या एका महिलेने दहिया यांच्यावर दुसरे लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यावर सरकारने दहिया यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
सरकारने निलंबन केल्यानंतर काही तासांनी दहिया यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करत राज्याच्या पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप न करू देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या अधिकारात येत असल्याचे म्हटले आहे.
मुख्य सचिव जे एन सिंह यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने बुधवारी गौरव दहिया यांना निलंबित केले आहे. या सचिवांनी अहवालाबाबत भाष्य करणे टाळले आहे. नुकताच चौकशी समितीने हा अहवाल राज्य सरकारकडे सोपविला आहे.
गेल्याच महिन्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मुख्य सचिव सुनैना तोमर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. दिल्लीच्या महिलेने दहिया यांच्याविरोधात दुसरे लग्न केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आयएएस अधिकारी चौकशी समितीसमोर दोनवेळा सामोरे गेले आहेत. यावेळी त्यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसही वेगळा तपास करत आहेत.
महिलेने हनीट्रॅप केले?
दहिया यांनी सांगितले की, या महिलेने त्य़ांना हनीट्रॅप केले आहे. दुसरीकडे पोलिसांनी या महिलेला दोन वेळा जबानी नोंदविण्यासाठी बोलावले होते. ती आली. मात्र, दहिया एकदाही गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेने दहिया यांच्यावर महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवून नंतर त्यांना सोडून दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे. चौकशी अधिकाऱ्यांना दहिया यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आढळले आहे. या महिलेने दिलेले पुरावेही खरे असल्याचे आढळले आहेत. यावर दहिया यांनी या महिलेने हनी ट्रॅप केल्याचे म्हटले आहे, तसेच ब्लॅकमेलही केल्याचा दावा केला आहे.