“माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबाचे कोणीही काम केले नाही”
By प्रविण मरगळे | Published: January 5, 2021 10:19 AM2021-01-05T10:19:53+5:302021-01-05T11:35:00+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणारा शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला
महिसागर - कृषी कायद्याबाबत देशातील शेतकर्यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. याचवेळी गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एका शेतकऱ्याने पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा शेतकरी वारंवार शासकीय मदतीसाठी पंचायत कार्यालयात चक्कर मारत होता. मात्र शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याने तो नाराज होऊन हे टोकाचं पाऊल उचललं.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणाऱ्या शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्याच्या घरी गोंधळ उडाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली असल्याचं समजलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, “माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबांचे काम कोणी केले नाही.”
आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना लावला फोन
आत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे. हा फोन पंचायत कार्यालयातून करण्यात आला होता. त्या वेळी शेतकर्याने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले की सरकारी कर्मचारी आपले काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहे. मात्र पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असा आरोप आहे. त्याचा परिणाम शेतक्याने आपला जीव दिला.
सुसाईड नोटमध्ये खासदार-आमदाराच्या नावाचा उल्लेख
आत्महत्या केलेल्या बलवंतसिंगच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदार आणि महिसागरचे आमदार जिग्नेश सेवक या दोघांची नावे लिहिली असल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: ही घटना अशावेळी घडली जेव्हा सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करत आहे
सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, सेवकचा अर्थ सेवा देणे आहे परंतु असं सरकारी कार्यालयात होत नाही, मी एक गरीब माणूस आहे आणि वर्षानुवर्षे भाजपावर विश्वास ठेवतोय. माझ्या आत्म्यात भाजपा आहे. शेवटपर्यंत भाजपासोबत राहिलो. माझा मृत्यू झाला तरी मी भाजपावर विश्वास ठेवत राहीन. पक्षात अजूनही माझा आत्मा आहे, पण गरीब असल्याने मला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने केला आरोप
बलवंतसिंग यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मुलगा राजेंद्रच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी स्वत:च्या जमिनीचा काही भाग विकून घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पाच वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेच्या मदतीसाठी अर्ज करत होते. या यादीत त्यांचे नावही आले, परंतु पंचायत कार्यालयाकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही असा आरोप त्याने केला आहे.