‘आयुष्याचा कंटाळा आलाय’; महिला डॉक्टरनं इंजेक्शन देऊन आई, बहिणीची हत्या केली त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 11:53 AM2021-08-23T11:53:56+5:302021-08-23T11:55:24+5:30
डॉ. दर्शना यांची आई आणि बहिण तिच्यावर निर्भर होत्या. त्यामुळे स्वत:चा जीव देण्याआधी महिला डॉक्टरनं या दोघांना आयुष्यातून संपवलं.
सूरत – गुजरातच्या सूरत इथे रविवारी एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका महिला डॉक्टरने स्वत:च्या आई आणि बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काटाग्राम परिसरातील ३० वर्षीय डॉ. दर्शना प्रजापती हिने ५९ वर्षीय आई मंजुलाबेन आणि २८ वर्षीय बहिण फाल्गुनीला इजेक्शनच्या माध्यमातून ओवरडोस देऊन त्यांची हत्या केली.
त्यानंतर महिला डॉक्टरने स्वत: खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. आई,बहिणीचा मृत्यू झाला परंतु तिचा जीव वाचला. सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विभागीय एसीपीआर डीजे छावडा यांनी सांगितले की, मंजुलाबेन आणि फाल्गुनी यांचा मृत्यू औषधाच्या ओवरडोसनं झाला. डॉ. दर्शना यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. दर्शना या आयुष्याला कंटाळल्या होत्या. जीवनात अनेक समस्यामुळे त्या चिंतेत असायच्या.
पोलिसांनी या महिला डॉक्टरचा जबाब नोंदवून घेतला आहे. डॉ. दर्शना यांची आई आणि बहिण तिच्यावर निर्भर होत्या. त्यामुळे स्वत:चा जीव देण्याआधी महिला डॉक्टरनं या दोघांना आयुष्यातून संपवलं. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. दर्शना यांनी तिच्यावर आई आणि बहिणीवर झोपेसाठी असणारं ड्रग्स इंजेक्शनच्या माध्यमातून दोघींना लावलं. महिला डॉक्टरनं नेमकं कोणतं औषध आई आणि बहिणीला दिल ते पोस्टमोर्टम झाल्यानंतरच समोर येईल असं पोलीस म्हणाले.
दरम्यान, डॉक्टर दर्शना ही आई, बहिण आणि भाऊ-वहिणीसोबत सहजानंद सोसायटीत राहत होत्या. घटनेच्या वेळी भाऊ-वहिणी घरात नव्हते. मात्र ते जेव्हा परतले त्यांनी घरातील दृश्य पाहून पोलिसांना बोलावले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीसही घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी आई-बहिणीचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवले तर डॉ. दर्शना यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत असून डॉ. दर्शना यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास करत आहेत. सध्या पोलीस भाऊ-बहिणींकडून डॉ. दर्शना यांच्या आयुष्याबद्दल चौकशी करत आहेत.