धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर स्पामध्ये दररोज 10-15 जणांकडून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 03:07 PM2022-09-18T15:07:50+5:302022-09-18T15:10:41+5:30
Gurugram Gang Rape : पीडितेने पोलिसांकडे न्याय मागितला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
गुरुग्राम : हरयाणातील (Haryana) गुरुग्राममधून (Gurugram) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका स्पामध्ये (Spa ) 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दररोज 10-15 जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पीडितेने पोलिसांकडे न्याय मागितला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी स्पा ऑपरेटरसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी स्पा ऑपरेटर आणि अन्य 3 जणांनी अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी स्पा ऑपरेटर झुमा आणि त्याचे तीन साथीदार पूजा, रुबेल इक्बाल आणि सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडितेने आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी तिला धीर देत गुरुग्रामच्या सेक्टर-51 मधील महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावेळी हे भयानक प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला.
महिनाभर आधी गुरुग्राममधील एका मॉलमध्ये पीडित मुलगी आरोपी पूजाला भेटली होती. पूजाने तिला डॉक्टरांच्या दवाखान्यात नोकरी देऊ केली. पीडिता नोकरीच्या शोधात होती म्हणून तिने पूजाची ऑफर स्वीकारली. ती डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करू लागली, पण दोनच दिवसांत तिला काढून टाकण्यात आले. त्यानंतर, पूजाने पुन्हा पीडितेला आपल्या नातेवाईकाच्या गुरुग्रामच्या स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीची ऑफर दिली, जो झुमा चालवत होता, असे पीडित मुलीने सांगितले.
पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, त्यादिवशी झुमाने एका व्यक्तीला बोलावले आणि पीडितेला खोलीत जाण्यास सांगितले. तिने विरोध केला असता चार आरोपींनी तिला घेरले. त्यानंतर झुमाने तिला सांगितले की, फक्त एक दिवस त्या माणसासोबत राहा आणि नंतर नोकरी सोड. त्यानंतर त्या माणसाने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच, नोकरी सोडल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू, अशी धमकी आरोपीने दिली. मी खूप घाबरले आणि पुढील 4-5 दिवस स्पामध्ये गेले. त्यावेळी अनेकांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. दररोज माझ्यावर जवळपास 10-15 जणांनी बलात्कार केला, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.