हॉटेलमध्ये मॉडेलची हत्या; BMW मध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:41 PM2024-01-03T17:41:17+5:302024-01-03T17:41:54+5:30
Crime News: पहाटे सव्वा चारला ती दोन व्यक्तींसोबत हॉटेलमध्ये पोहोचली होती. रात्री १० नंतर तिला चादरीत टाकून नेले...
गुरुग्राममध्ये एका मॉडेलच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका हॉटेलमध्ये तिची हत्या झाली आहे आणि तिचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये घालून आरोपीने नेला आहे. एका गँगस्टरच्या हत्येमधील ती साक्षीदारही होती.
दिव्या पाहुजा असे मृत मॉडेलचे नाव आहे. ती २७ वर्षांची आहे. दिव्याचा मृतदेह घेऊन आरोपी फरार झाला आहे. मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगर येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे.
ज्या हॉटेलमध्ये तिची हत्या झाली त्या हॉटेल मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने साथीदारांना 10 लाख रुपये दिले आहेत. यानंतर अभिजीतच्या दोन साथीदारांनी अभिजीतच्या निळ्या रंगाच्या BMW कारच्या डीक्कीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता पोलीस अभिजीत आणि त्याच्या कारचा शोध घेत आहेत.
2 जानेवारीला पहाटे 4.18 वाजता अभिजीत हा एक तरुणी आणि अन्य एका व्यक्तीसोबत हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचला होता. तेथून तिघेही रुम क्रमांक १११ मध्ये गेले. त्यानंतर २ जानेवारी रोजी रात्री 10:44 वाजता अभिजीत आणि इतर आरोपी दिव्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून ओढताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत.
दिव्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुरुग्राम पोलिसांनी हॉटेल मालक अभिजीत सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अभिजितसोबत कारमध्ये आणखी दोन व्यक्ती दिसत आहेत, ते कुठे गेले याचा शोध घेतला जात आहे.