दीड कोटीचा गुटखा जप्त; ‘गुटखाकिंग’चे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:02 AM2022-01-24T09:02:42+5:302022-01-24T09:03:11+5:30
एसपी बच्चन सिंह यांची कारवाई : रिसोडमधील तीन खोल्यांवर टाकला छापा
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील धोबीगल्लीतील पडक्या तीन खोल्यांमधून १.५ कोटीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जानेवारी रोजी दुपारी ताब्यात घेतला. या कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक बच्चन सिंह स्वत: हजर असल्याने गुटखा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
गुटख्याबाबत पोलीस अधीक्षकांना गुप्त माहिती मिळाल्याने बच्चन सिंह यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
त्यानुसार २३ जानेवारी रोजी रिसोड शहरातील धोबीगल्लीतील तीन पडक्या खोल्यांवर छापा टाकला. तेथे एक कोटी ५० लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. गुटखाप्रकरणी कारवाई केल्यानंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी रिसोड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गुटखा विक्री करणाऱ्यांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. गुटखा प्रकरणात सागर तापडिया व तौफिक खान या दोघांना ताब्यात घेतले आहे, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.