नागपुरात अडीच लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:27 PM2020-07-11T22:27:36+5:302020-07-11T22:31:54+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. विशाल प्रदीप परमार (रा. इतवारी मिरची बाजार) आणि मोहन शामलाल शाहू (रा. वनदेवीनगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून, त्यांचा सलीम नावाचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.
गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक शुक्रवारी रात्री इतवारी परिसरात गस्त करीत असताना त्यांना एक ऑटो दिसला. त्यात बसलेल्या आरोपींचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठी पोती भरून दिसली. परमार आणि शाहू या दोघांना पोलीस विचारपूस करीत असतानाच आरोपी सलीम तेथून पळून गेला. ऑटोमध्ये असलेल्या पोत्यात एमएलडी ३३ नामक गुटख्याचे ७२०० पॅकेट आढळले. त्याची किंमत दोन लाख ३७ हजार ६०० रुपये असून, ज्या ऑटोतून गुटख्याची वाहतूक केली जात होती तो एक लाख रुपयाचा ऑटो असा एकूण ३ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईसाठी त्यांनी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी प्रफुल टोपले यांनाही बोलवून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक निरीक्षक पंकज घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
खामल्यात दारू जप्त
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने खामला येथील सिंधी कॉलनीत राहणारा आरोपी विजय डेंबवानी याच्या घरी छापा मारून त्याच्याकडून इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग डिलक्स अशा विदेशी ब्रँडच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोपी डेंबवानी परवाना नसताना अवैध दारू विक्री करीत होता. त्याच्याकडे दारू घेणाऱ्याची नेहमी गर्दी होत होती. डेंबवानी याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी ही कारवाई केली.