मध्य प्रदेशच्या सीमेवर गुटखा पकडला; सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त
By सदानंद सिरसाट | Published: August 20, 2023 05:22 PM2023-08-20T17:22:46+5:302023-08-20T17:23:20+5:30
सततची तस्करी सुरूच : आरोपींना पोलिस कोठडी
खामगाव (बुलढाणा) : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेलगत निमखेडी फाट्यावर ५ लाख ५० हजारांचा प्रतिबंधित गुटख्यासह आसलगाव येथील आरोपी दोघांना अटक केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला. पोलिसांनी ९.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी निमखेडी फाटा येथे वाहनांची तपासणी केली. त्यावेळी चारचाकी क्रमांक एमएच ४८ एटी ०४८२ या वाहनातून दाेघे प्रवास करीत होते. चौकशीमध्ये वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा किंमत ५ लाख ५२ हजार रूपये आढळून आला. सोबत २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, वाहनाची किंमत ४ लाख रुपये मिळून एकूण ९ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी सहायक फौजदार संजय समाधान राऊत यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून गुटखा घेऊन येणारे जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील आरोपी संदीप सुनील भावसार (३५), किरण गोपाल येनकर (३३) या दोघांवर भादंविचे कलम कलम ३२८, २७३, अन्न सुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक नारायण सरकाटे करीत आहेत. आरोपींना जळगाव येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.