आकोटात पकडला आठ लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:30 PM2018-08-01T18:30:50+5:302018-08-01T18:44:57+5:30
अकोट: अकोट शहर पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला आठ लाखाचा गुटखा व पान मसाला जप्त केला. पोलिसांनी जप्तीत दाखविलेले दोन वाहन व गुटखा असा १५ लाखाचा मुद्देमाल १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.
अकोट:अकोट शहर पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला आठ लाखाचा गुटखा व पान मसाला जप्त केला. पोलिसांनी जप्तीत दाखविलेले दोन वाहन व गुटखा असा १५ लाखाचा मुद्देमाल १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. अकोट शहराच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी गुटखा जप्तीची कारवाई करावी लागली.
अकोट शहरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, अकोल्यावरून अकोटकडे येत असलेल्या वाहनामधून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला येत आहे. यावरून त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने एमएच ३० एव्ही ०३७७ क्रमांकाचे टाटा पिकअप वाहन दुपारी आणले, तर एमएच ३० बीडी ०७८५ क्रमांकाचे टाटा वाहनाची रात्री तपासणी केली. या दोन्ही वाहनातून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला सागर, गुलाम, वाह, पानबहार, काली बहार, निली बहार असा अवैध गुटखा आढळून आल्याने रीतसर पंचनामा करून जप्त करण्यात आला असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. अवैध गुटख्याची वाहतूक करणारे वाहनचालक शेख आबीद शेख इमदाद रा. बेईतपुरा अकोला व वाहनाचा चालक फय्याज बेग गुलाम बेग रा. शिवणी अकोला यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ लाखांचा गुटखा व ७ लाखांची वाहने असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके व गुन्हे शोध पथकाने केली आहे. दरम्यान, अकोट शहर पोलिसांनी जप्त केलेला लाखोंचा गुटखा व पान मसाला १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासन अकोला येथील सहायक आयुक्त एल. जी. राठोड व अन्न सुरक्षा अधिकारी जी. डब्ल्यू. गोरे यांच्या ताब्यात दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)