पेणकरपाड्यातून ७७ लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:59 PM2019-11-26T19:59:27+5:302019-11-26T20:02:55+5:30
पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पेणकरपाडा भागातल्या एका गोदामातुन बंदी असलेला ७७ लाखांचा गुटखा सापडला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि काशिमीरा पोलीसांनी ही कारवाई केली असून एका कर्मचाऱ्यास अटक केली असली तरी पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनंतर पेणकरपाड्यातील विशा भारवाड चाळीत असलेल्या फजल काझी यांच्या गाळ्यावर पोलीसांसह एकत्र येऊन धाड टाकली होती. या गोदामात गुटखा साठवून नंतर तो मुंबई, ठाणे आदी भागात पुरवठा केला जात असल्याची माहिती होती. गोदामात सापडलेला कर्मचारी चांद इब्राहिम शेख (२३) रा. जनता नगर, काशिमीरा या कर्मचारायास अटक करण्यात आली होती.
काझी यांनी सदर गाळा भाड्याने दिला असून या प्रकरणी पाच आरोपींचा शोध सहाय्यक निरीक्षक गणेश भामरे व पथक घेत आहेत. घटनास्थळवारुन ४ के स्टार गुटखा आणि एसएचके गुटख्याने भरलेल्या ३२६ गोणी सापडल्या आहेत. सदर साठा अन्न व औषध प्रशासनाने आपल्या ताब्यात ठेवला आहे. बंदी असूनही शहरात राजरोसपणे गुटखा विक्रीच्या तक्रारी असतानाच आता गुटख्याच्या साठ्याचे गोदामच सापडल्याने परिसरातील नागरीकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.