धक्कादायक! सुखी संसाराचं स्वप्न भंगलं; हुंडा न आणल्यानं सासरच्यांनी विवाहितेला अॅसिड पाजलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 10:44 AM2021-08-22T10:44:33+5:302021-08-22T10:44:52+5:30
पतीसह तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल; महिलेनं मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ
ग्वाल्हेर: हुंडा न आणल्यानं सासरच्या माणसांनी छळ केलेल्या महिलेनं अखेर प्राण सोडला. अनेक दिवसांपासून विवाहितेचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. ज्या व्यक्तींनी मला ऍसिड पाजलं त्यांना सोडू नका, असं म्हणत महिलेनं शेवटचा श्वास घेतला. व्हिडीओमध्ये महिलेनं आरोपींची नावं घेतली आहेत. या प्रकरणी आधी पोलिसांनी छळ आणि हुंडा मागितल्याचे गुन्हे दाखल केले होते. यासोबतच आता पोलिसांनी तीन जणांविरोधात हत्येचा गुन्ह्याचीदेखील नोंद केली आहे.
या प्रकरणी पीडितेचा पती विरेंद्र जाटव, नणंद बबिता आणि वहिनी आधीच तुरुंगात आहेत. पीडितेनं मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे सगळ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी रात्री पीडितेची मृत्यूसोबतची झुंज संपष्टात आली. शुक्रवारी हाफ डे असल्यानं शवविच्छेदन होऊ शकलं नाही. शनिवारी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणण्यात आला.
प्रकरण काय?
ग्वाल्हेरच्या घाटीगाव सिमरिया गावाची रहिवासी असलेल्या २२ वर्षीय शशी जाटवचा विवाह १७ एप्रिल २०२१ रोजी रामगढच्या विरेंद्रसोबत झाला. शशीच्या कुटुंबीयांनी लग्नात १० लाख रुपये खर्च केले. विरेंद्रला नवी कार खरेदी करायची होती. त्यासाठी ३ लाख रुपये कमी पडत होते. विरेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांनी शशीला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले. मात्र तिनं नकार दिला. त्यामुळे २८ जूनला विरेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांनी शशीला ऍसिड पाजलं. शशीवर आधी ग्वाल्हेरमध्ये उपचार झाले. मग तिला दिल्लीला हलवण्यात आलं. ऍसिडमध्ये शशीच्या पोटातील आतड्यांना गंभीर दुखापत झाली. काही दिवसांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गुरुवारी रात्री तिनं अखेरचा श्वास घेतला.