लग्नापूर्वीच गाठावे लागले पोलिस ठाणे; नवरी निघाली ठग, दागिन्यांसह पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:22 AM2022-12-15T11:22:28+5:302022-12-15T11:22:58+5:30
ऑनलाइन जोडीदार शोधताना त्याची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीला गोपनीय माहिती, पासवर्ड, तसेच वैयक्तिक फोटो शेअर करू नका.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होताच, आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी लग्न जुळवून साखरपुड्याची तयारी केली. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच होणारी नवरी साखरपुड्यासाठी घेतलेले दागिने आणि पैसे घेऊन पसार झाल्याने तरुणाला पोलिस वारी करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी खंडणी, तसेच फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
आयटी इंजिनीअर असलेला तरुण कांदिवली परिसरात कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. शादी डॉट.कॉम या बेबसाइटवरून त्याची सुप्रिया सिंगसोबत ओळख झाली. संवाद वाढला. त्यानंतर, सुप्रियाने कुटुंबीयांसोबत जवळीक वाढविली. लग्नही ठरले. साखरपुडा करण्याचा बनाव करत, तरुणी सोन्याचे दागिने, मोबाइल फोन व कपडे, पैसे असे एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज बळकावून नॉट रिचेबल झाली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तरुणाला धक्का बसला. अखेर १२ तारखेला चारकोप पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी सुप्रियासह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे तरुण मानसिक धक्क्यात आहे. या प्रकरणी चारकोप पोलिस अधिक तपास करत आहेत.
सतर्क रहा!
ऑनलाइन जोडीदार शोधताना त्याची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीला गोपनीय माहिती, पासवर्ड, तसेच वैयक्तिक फोटो शेअर करू नका. पैशाची मागणी होताच, वेळीच सतर्क होत, संवाद थांबवा. कुणावर संशय असल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात
पत्नीच्या निधनानंतर आलेल्या एकटेपणेला कंटाळून, तसेच आजारपणात सोबत हक्काची व्यक्ती हवी, म्हणून वयाच्या ७० वर्षी एका आजोबांनी पुन:श्च हरिओम करण्याचे ठरविले. आयुष्यावर आलेले एकटेपणाच्या लॉकडाऊनचे मळभ दूर करण्यासाठी आजोबांनी मित्राच्या मदतीने लग्नही जुळविले, परंतु लग्नाच्या बेडीचे कायदेशीर सोपस्कार होण्याआधीच ४४ वर्षीय वधूने घरातील दीड लाख रुपये, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन पोबारा केला.