100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या हैदर इराणीला अखेर बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 05:32 PM2021-06-12T17:32:23+5:302021-06-12T17:32:34+5:30
अनलॉक सुरु झाल्यावर रस्त्यावर आणि प्रवासात गर्दी दिसून येत आहे. लोक घराबाहेर पडू लागल्याने चोरही सक्रीय झाले आहे. मोबाईल आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत आहेत.
कल्याण - शंभर पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या हैदर तहजीब इराणी या सराईत गुन्हेगारास खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांवरील हल्ल्याचा हैदर मास्टर माईंड होता. इतक्या मोठा गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्याने त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे.
अनलॉक सुरु झाल्यावर रस्त्यावर आणि प्रवासात गर्दी दिसून येत आहे. लोक घराबाहेर पडू लागल्याने चोरही सक्रीय झाले आहे. मोबाईल आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत आहेत. ठाण्यात मोबाईल चोरटय़ाशी दोन हात करताना दोन जणांना जीव गमाविण्याची वेळ आली. काही दिवसापूर्वी रेल्वेतून प्रवासी करणाऱ्या एका मॉडेलचा चोरटय़ाने मोबाईल हिसकावून पळ काढला. तसेच शनिवारी आंबिवली कल्याण रेल्वे स्थानकात चोरटय़ाने प्रवाशावर हल्ला करुन मोबाईल हिसकावून पळ काढला. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी योगेश गायकर यांनी आंबिवली नजीकच्या इराणी वस्तीत छापा टाकून हैदर तहजीब इराणी याला अटक केली आहे. त्याविरोधात कल्याण डोंबिवलीत २५, मुंबईत ३०, राज्यभरात आणि राज्याच्या बाहेर परराज्यात मिळून जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
२ मार्च रोजी इराणी वस्तीत एका आरोपीला पकडण्यासाठी वसई पोलिस आले होते. त्यांनी आरोपीला घेऊन जात असताना आंबिवली रेल्वे फाटका दरम्यान पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे पकडलेला आरोपी पळून गेला. त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला होता. पोलिसांवरील या हल्ल्यास यापूर्वी झालेल्या १० ते १२ घटनांचा मास्टर माईंड हैदर असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षभरात खडकपाडा पोलिसांनी २५ इराणी आरोपींना पकडून अन्य पोलिस ठाण्यांच्या हवाली केले आहे.