बँकेतून 1 कोटी लुटले, पत्नीच्या नावावर घेतली जमीन; पोलिसाच्या लेकाचा फिल्मी स्टाईल कट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 12:33 PM2023-12-04T12:33:17+5:302023-12-04T12:39:18+5:30
काही वेळातच 4 दरोडेखोरांनी बँकेतून 1 कोटींहून अधिकची रक्कम लुटली. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचाही समावेश असून, त्याने लुटलेल्या पैशातून पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली होती.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील लालगंज येथील एक्सिस बँकेतून सुमारे एक कोटी रुपयांची लूट करण्यात आली. ही घटना 1 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, सकाळी बँक उघडली असताना एक महिला रेकी करताना दिसली. यानंतर काही वेळातच 4 दरोडेखोरांनी बँकेतून 1 कोटींहून अधिकची रक्कम लुटली. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचाही समावेश असून, त्याने लुटलेल्या पैशातून पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी लालगंजच्या एक्सिस बँकेत काम सुरू करणार होते. त्याचवेळी दरोडेखोरांची टोळी बँकेत घुसली होती. सर्वप्रथम एक दरोडेखोर आपल्या महिला साथीदारासह बँकेच्या मुख्य गेटजवळ असलेल्या एटीएमजवळ पोहोचला होता. एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने बँकेत डोकावले. महिला आणि दरोडेखोर एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा करत असल्याचं या घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
बँकेच्या आत डोकावून ते परिस्थितीचा अंदाज घेतात. काही वेळाने चार दरोडेखोर एकामागून एक बँकेत घुसले. प्रत्येकाने मास्क घातले होते आणि हातात शस्त्रं होती. दरोडेखोरांनी काही सेकंदात कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाक दाखवून घाबरवलं आणि सुमारे 8 मिनिटांत कॅश रूम रिकामी केली. या दरम्यान एक कोटीहून अधिक रुपयांची लूट झाली आहे.
पोलिसांनी या घटनेनंतर एका दरोडेखोराला दिल्लीतून अटक केली आहे. एका महिलेसह अन्य चार आरोपींना मुझफ्फरपूरमधून अटक करण्यात आली आहे. या दरोड्यातील एकूण 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 15 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण कट पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलानेच रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लुटलेल्या पैशातून त्याने महागडी जमीन खरेदी केली होती.
वैशालीचे एसपी रवी रंजन यांनी सांगितलं की, अॅक्सिस बँकेतून लुटल्याची घटना घडली आहे. यापूर्वी 6 दरोडेखोरांना पकडून जेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. लुटलेल्या पैशाने खरेदी केलेली जमीन जप्त करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीने एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याने पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली होती.