नागपुरात अडीच तासात एक 'हाफ' एक 'फूल्ल मर्डर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:04 AM2020-02-16T00:04:45+5:302020-02-16T00:05:50+5:30
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एकाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाने धावपळ निर्माण झाली असतानाच तिकडे रात्री ८ च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची चार ते पाच आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एकाची चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाने धावपळ निर्माण झाली असतानाच तिकडे रात्री ८ च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची चार ते पाच आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली. अवघ्या अडीच तासात हत्येचा प्रयत्न हत्या असे दोन गुन्हे घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी मोमीनपुऱ्यातील मोहम्मद जैदूल अमान (वय १८) नामक तरुणाला चार अल्पवयीन आरोपींनी सीताबर्डीत मिठा निम दर्गाह जवळ अडविले. तेथे हमरीतुमरी करत चौघांनी जैदुलवर चाकूने हल्ला चढवला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचे पाहून अनेकांनी तिकडे धाव घेतली. आरोपींना अडवून जखमीला वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलीस उपनिरीक्षक पवार आपल्या साथीदारांसह तिकडे पोहचले. जखमी तरुणाला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. ते सर्व अल्पयवीन असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. १५ दिवसापूर्वी जैदुलसोबत वाद झाला त्यावेळी त्याने मारहाण केल्यामुळे आरोपी मयंक आणि साथीदारांनी बदला घेण्यासाठी हा गुन्हा केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. वृत्त लिहिस्तोवर सीताबर्डी पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू होती. तिकडे मेयोत जैदुलचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येत जमल्याने तणावाचे वातावरण होते.
मस्कासाथ पुलावर थरार
मस्कासाथ पुलाजवळ चार ते पाच आरोपींनी चाकूने भोसकून एकाला ठार मारले. तर, त्याला वाचविण्यासाठी धावणाऱ्याला जखमी केले. मृताचे नाव सुभाष विश्वकर्मा (वय अंदाजे ३० वर्षे) असल्याची माहिती पोलिसांकडून पुढे आली होती. मृत तरुण भिलाई (छत्तीसगड) येथील रहिवासी होता. तो कामाच्या शोधात नागपुरात आला होता. शनिवारी रात्री तो आपल्या मित्रांसह मस्कासाथ पुलाजवळ उभा असताना अज्ञात कारणावरून वाद घालून आरोपींनी त्याला भोसकल्याचे समजते. मृत मिळेल ते काम करायचा आणि मजुरांच्या ठिय्यावर कुठेही झोपायचा, असा त्याचा दिनक्रम होता. हत्येचे कारण आणि आरोपीचा शोधात असल्याचे लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी लोकमतला सांगितले. या घटनेमुळे मस्कासाथ पुलाजवळ रात्री ११ वाजतापर्यंत तणावाचे वातावरण होते.