वाहन चालवताना झालेल्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:07 PM2020-01-24T18:07:21+5:302020-01-24T18:20:12+5:30
आरोपी नवले उड्डाणपूल परिसरातून गोव्याला जाणार असल्याची मिळाली माहिती
पुणे : दोन महिन्यापूर्वी धनकवडी येथे वाहन चालविताना वादावादीचा राग मनात धरून नुकताच कात्रज तलाव परिसरात खूनी हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. गोव्याला पलायन करणाऱ्या तिघांना पोलिसांनीअटक केली आहे.
धनकवडी येथे अमित रामदास निंबाळकर (वय २५, रा.गुजर निंबाळकरवाडी) आणि सागर पोपट माने ( वय ३०, रा , पर्वती) यांच्यात वादावादी झाली होती. तो राग मनात धरून सागर याने अमितच्या खूनाचा कट रचला. राजस सोसायटी कात्रज तलावाजवळ सुनील उर्फ राठ्या गोपाळ राठोड, प्रतीक उर्फ प्रद्या संजय नलावडे यांनी अमितवर कोयत्याने व लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केला. आजूबाजूचे नागरिक जमा झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. भारती विद्यापीठ पोलिसांना आरोपी नवले उड्डाणपूल परिसरातून गोव्याला जाणार असल्याची माहिती मिळताच तिघांना पकडण्यात यश आले आहे. सागरसह सुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी (वय २४, रा. टिळेकरनगर, कोंढवा, मूळ गुलबर्गा, कर्नाटक), सुनील उर्फ राठ्या गोपाळ राठोड (वय २३ वर्षे, रा. उत्तमनगर ,) प्रतीक उर्फ प्रद्या संजय नलावडे (वय २२ वर्षे रा. भोसले वस्ती, येरवडा ) यांना अटक केली. त्यांच्याकडे गुन्हाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी जखमी अमित निंबाळकर व सागर माने यांचे दोन महिन्यांपूर्वी धनकवडी येथे किरकोळ अपघातावरुन वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून सागर माने याच्या सांगण्यावरून अमित निंबाळकर यास जिवे मारण्यासाठी मारहाण केल्याची कबुली दिली. आरोपी सुनील राठोड याच्याविरुद्ध उत्तमनगर, वारजे माळवाडी, पौड येथे मारहाण, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे असून तो उत्तमनगर येथून तडीपार आहे. तसेच प्रतीक नलावडे यांच्याविरुद्ध उत्तमनगर येथे जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कोते करत आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सजेर्राव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, गुन्हे शाखेचे विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक भुषण कोते, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, महेश मंडलिक यांनी केली.