महिला न्यायाधीशांना 'बर्थ डे'च्या शुभेच्छा दिल्या, आरोपी वकिलास अटक
By महेश गलांडे | Published: March 3, 2021 11:01 AM2021-03-03T11:01:23+5:302021-03-03T11:02:31+5:30
वकिलाने ई-मेलच्या माध्यमातून महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासाठी, फेसबुक अकाऊंटवरुन न्यायाधीशांचा फोटो डाऊनलोड केला होता.
भोपाळ - वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं ही सामान्य बाब झाली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. मेसेजेस, फोन, व्हॉट्सअप आणि फेसबुकवरुनही मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, मध्य प्रदेशातील एका वकिलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण, महिला न्यायाधीशास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर वकिलास अटक करण्यात आली आहे.
वकिलाने ई-मेलच्या माध्यमातून महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासाठी, फेसबुक अकाऊंटवरुन न्यायाधीशांचा फोटो डाऊनलोड केला होता. त्यानंतर, महिला न्यायाधीशांनी पोलिसात तक्रार दिल्याने आरोपी वकिलास अटक करण्यात आली. मिथाली पाठक असे न्यायाधीशांचे नाव असून आरोपीने २९ जानेवारीला ईमेल आणि वाढदिवसाचं कार्ड पाठवलं. विजयसिंग यांनी मिथाली पाठक यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन फोटो डाऊनलोड करत तो वाढदिवसाच्या कार्डसोबत जोडल्याचा आरोप आहे. यासंदर्भात तक्रारीनंतर ९ फेब्रुवारीला रतलाम पोलिसांनी वकील विजयसिंग यादव यांना अटक केली होती.
विजयसिंग यादव यांनी कोणतीही परवानगी न घेता न्यायाधीशांचा फोटो वापरला आणि त्यांच्या अधिकृत खात्यावर मेल पाठवला. विजयसिंग यादव फेसबुकवर न्यायाधीशांच्या मित्रांच्या यादीत नसल्याने अनधिकृतपणे फोटोचा वापर केल्याने त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतही कारवाईची शक्यता आहे. १३ फेब्रुवारीला विजयसिंग यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाने जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे विजयसिंग यादव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादव यांनी आपल्यावर अनावश्यक गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. न्यायाधीशांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहे. याशिवाय आपल्याला इंटरनेट आणि सोशल मीडियाची इतंभू माहिती नसल्याचाही दावा त्यांनी केलाय.