कुख्यात गुंड छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बॅनर झळकल्याने एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 18:51 IST2020-01-12T18:48:42+5:302020-01-12T18:51:20+5:30
सी.आर. सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून मध्यरात्री छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर

कुख्यात गुंड छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बॅनर झळकल्याने एकच खळबळ
ठाणे -आजवर आपण वाढदिवसानिमित्त राजकीय नेते किंवा अभिनेत्यांचे बॅनर लावले जात होते. मात्र, गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर नाना ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन या सध्या सीबीआयच्या अटकेत असलेल्या गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. सी.आर. सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून मध्यरात्री छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
आता ठाण्यात कुख्यात गुंडाला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकला आहेत. १३ जानेवारीला छोटा राजनचा वाढदिवस असल्याचं म्हणत त्याला बॅनरबाजी करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर शुभेच्छुक प्रकाश भालचंद्र शेलटकर, अध्यक्ष ठाणे शहर, संगीताताई शिंदे, ठाणे शहर, महिला अध्यक्ष, राजाभाऊ गोळे, अध्यक्ष, मुंबई शहर आणि हेमचंद्र (दादा) मोरे संस्थापक - अध्यक्ष या व्यक्तींची नावे त्या बॅनरवर छोटा राजनला बॅनर लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ठाणे - कुख्यात गुंड छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बॅनर झळकल्याने एकच खळबळ https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 12, 2020
छोटा राजनला शुभेच्छा देणारा हा बॅनर ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे एका बस स्टॉपवर लावण्यात आला आहे.छोटा राजनवर महाराष्ट्रात तब्बल ७० केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणाचाही समावेश आहे. तसेच इतर हत्या, खंडणी, धमकावणे अशा अनेक गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत छोटा राजन फरार होता. ज्याच्या मुसक्या काही वर्षांपूर्वी परदेशात आवळण्यात आल्या होत्या. छोटा राजनला २५ ऑक्टोबर २०१६ रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले.
सध्या छोटा राजन हा देशातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार जेलमध्ये बंद असून त्याच्यावर आरोप असलेल्या अनेक प्रकरणात छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो सुनावणीस हजर राहतो. या बॅनरबाजीविरोधात आता पोलीस कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता आहे.