‘कॅन्सर’चा आजार, त्यात सराफ दागिने घेऊन पसार, अंगणवाडी मदतनीस महिलेला पोलिसांचे ‘हॅप्पी न्यू ईअर’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 09:04 AM2022-01-01T09:04:51+5:302022-01-01T09:06:00+5:30
Mumbai : पाल या संजयनगरच्या पठाणवाडी परिसरात पती सुखराज आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचे पती रिक्षाचालक असून पाल या साडेचार हजारावर नोकरी करत संसाराला हातभार लावतात.
- गौरी टेबकर- कलगुटकर
मुंबई: ‘‘मी ब्रेस्ट कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होती. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने माझे दागिने गहाण ठेवले. जे व्याजासह त्याला परतही केले. ते पैसे आणि माझे दागिने घेऊन सराफ पसार झाला. चार वर्षांनी ते मला परत मिळाले आहेत, ज्याची आशाच सोडली होती. पोलिसांनी खऱ्या अर्थाने माझे न्यू इयर हॅप्पी केले आहे. मी त्यांची आभारी आहे’’, अशी प्रतिक्रिया अंगणवाडी मदतनीस अरुणा पाल यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
पाल या संजयनगरच्या पठाणवाडी परिसरात पती सुखराज आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचे पती रिक्षाचालक असून पाल या साडेचार हजारावर नोकरी करत संसाराला हातभार लावतात. त्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये त्यांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे कळले. त्यामुळे तातडीने उपचार करणे गरजेचे होते. मुलगा लहान असल्याने आपल्या मागे त्याचे काय होणार?, या चिंतेने त्यांनी पैशांची सोय करण्यासाठी ओळखीच्या सराफाकडे दागिने गहाण ठेवले. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
सराफाचे पैसे त्यांनी परत केले. तो दागिने घेऊन पसार झाला. याप्रकरणी त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कॉन्स्टेबल विजय पांचाळ यांनी चांगले सहकार्य करत मार्गदर्शन केले. मात्र तरी दागिने परत मिळतील अशी आशा नव्हती. पण, थर्टी फर्स्टच्या दिवशी हे दागिने परत मिळाल्याने नवीन वर्षाचे स्वागत मी ते घालूनच करेन असे त्या म्हणाल्या. तर, इस्टेट एजंट श्रेणील शाह यांच्या २० जुलै, २०२१ रोजी चोरीला गेलेल्या ॲक्टिव्हाची चावी त्यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
‘पाच लाख गमावले आणि दहा हजार मिळाले’
दहिसरच्या घरटन पाड्यामध्ये राहणारे पुंडलिक सरोदे कुटुंबीय १० फेब्रुवारी, २०१९ मध्ये कुटुंबासह बाहेर गेले होते. त्यावेळी चोरांनी १४ ते १७ तोळे सोने, ८० हजार रोख मिळून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. सतत पाठपुरावा केल्यावर १० हजारांची रोकड आणि कॅमेरा आम्हाला शुक्रवारी परत देण्यात येतोय. तसेच दीड तोळे सोने हस्तगत केल्याचे समजले. मात्र त्यासाठीदेखील कोर्टात फेऱ्या माराव्या लागल्या. ज्यात नवऱ्याचा किती तरी दिवसांचा पगार बुडाला आणि रिक्षाला खर्च किती केले त्याचा काही हिशेबच नाही, असे त्यांनी सांगितले.