अल्पवयीन बलात्कार पीडितेवर फेकलं अॅसिड; कुटुंबीय दहशतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 04:46 PM2020-02-03T16:46:52+5:302020-02-03T16:48:04+5:30
कडक कायदा आणि सरकारनं केलेल्या अनेक दाव्यांनंतर अॅसिड हल्ल्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत.
नवी दिल्लीः कडक कायदा आणि सरकारनं केलेल्या अनेक दाव्यांनंतर अॅसिड हल्ल्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत. उत्तर प्रदेशमधल्या हापुडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बलात्कार पीडितेवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोर विकृतानं पुन्हा अॅसिड फेकण्याची धमकी देऊन तो फरार झाला. पीडितेला गंभीर स्वरूपात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
अॅसिड हल्ल्याची ही घटना हापुडमधल्या बाबूगड ठाण्याजवळ घडली आहे. जून 2019मध्ये अल्पवयीन मुलीवर एका तरुणानं बलात्कार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. रविवारी आरोपीनं अल्पवयीन बलात्कार पीडितेवर अॅसिड हल्ला करण्यात आला. ज्यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपींचे नातेवाईक आमच्यावर समझोता करण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोपी पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. परंतु आरोपीच्या नातेवाईकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या हल्ल्यात पीडितेच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्वच आरोपींनी माझ्या पायावर अॅसिड फेकलं असं पीडितेनं आपल्या जबाबात सांगितलं आहे. तसेच आता पायावर अॅसिड टाकलं आहे, पुढच्या वेळी चेहऱ्यावर अॅसिड टाकू, अशी धमकी देखील त्या नराधमांनी पीडितेला दिली आहे. अल्पवयीन मुलीवर जून 2019मध्ये बलात्कार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.